प्रकाश आंबेडकर, मनोज झा, जितेंद्र आव्हाड यांची जोरदार टीका

नागरिकत्व सुधारणा कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या प्रस्तावित देशभर विस्ताराला विरोध दर्शविण्यासाठी शुक्रवारी विरोधी कृती समितीतर्फे येथील आमखास मदान ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर झालेल्या सभेत वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते खासदार मनोज झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आदींनी केंद्र सरकारला लक्ष्य करत सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.

या वेळी मंचावर उषा दराडे, सुभाष लोमटे, अफसरखान, सुरजितसिंग खुंगर, कदीर मौलाना, अण्णासाहेब खंदारे, जियाउद्दीन सिद्धीकी, अब्दुल वाजेद कादरी, आमदार जिशान सिद्धीकी, शोएब कादरी आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थिती होती. मोर्चात सहभागी होण्यासाठी सर्वधर्मीय लोक उपस्थित होते. मुस्लीमबहुल भागातील अनेक दुकाने दुपारनंतर बंद ठेवण्यात आली होती.

या वेळी अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, सीएए, एनआरसी हा कायदा मुस्लीमविरोधी आहे हे सत्य असले तरी याचे ४० टक्के हिंदू बांधव शिकार होतील. हा कायदा संविधान विरोधीसुद्धा आहे. आता देशाचे संविधान तुमच्या हातात सुरक्षित नाही. तुमची विचारधारासुद्धा संकुचित आहे, असे सांगत केंद्र सरकारवर मनोज झा यांनी टीका केली.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘हा देश कुणाच्या बापाचा नाही. आज मुस्लिमाकडे संशयाने बघण्याची गरज नाही. कितीतरी हिंदूंकडेही पुरावे सापडणार नाहीत. इंग्रजांना जसे बिगर हत्याराने पळविले तसेच तुम्हालाही पळवू,’ असा इशारा त्यांनी दिला. या लढाईमध्ये राम आणि रहीम यांना एकत्र लढावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.