छत्रपती संभाजीनगर : पोलिसांच्या गणवेषावरील नावपट्टीवरून आडनाव हटवण्याच्या ‘बीड’ प्रारूपाची राज्यभर चर्चा झाल्यानंतर त्याचे अनुकरण छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून केले जात आहे का, असा एक प्रश्न उपस्थित झाला असून, काही उच्चपदस्थ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नावपट्टीवरून आडनाव हटवले आहे.

बीड जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अधिकाऱ्यांची जातीय अंगाने यादी समाजमाध्यमात प्रसृत झाली होती. तर, संतोष देशमुख हत्या प्रकरणातून पोलीस विभागातीलही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर जातीय अंगाने आरोप होऊ लागले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीला जे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन झाले होते त्यात समाविष्ट अधिकाऱ्यांवरही पुन्हा जातीय ओळखीतून आरोप करून त्यांना समितीतून काढून टाकण्याची मागणी झाली होती. संबंधित अधिकाऱ्यांना हटवून एसआयटीचे पुनर्गठण करण्यात आले होते.

या वादावादीतून पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी बीड पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गणवेष व दालनातील नावपट्टीवरून आडनाव हटवण्याचा एक आदेश काढला. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची जातीय ओळख पुसून टाकण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांच्या निर्णयाकडे पाहिले गेले. त्याचे अनेक स्तरांतून स्वागतही झाले होते. राज्यभरही काॅवत यांच्या निर्णयाची चर्चा झाली होती. काहींनी जातीयवाद असा आडनाव हटवण्यातून संपुष्टात येऊ शकतो का, असा प्रश्नही उपस्थित केला होता.

ही सर्व पार्श्वभूमी समोर असताना छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातही काही अधिकाऱ्यांनी आपल्या नावपट्टीवरून आडनाव हटवले आहे. आडनाव हटवण्यासंदर्भाने वरिष्ठांचे कसलेही आदेश नाहीत. तसे काही आदेश निघतील, अशी शक्यता नसली तरी काहींनी आडनावविरहित नावपट्टी लावण्याला पसंती दिल्याचे चित्र आहे.

आपण आपल्या पसंतीने आडनाव हटवले आहे. आपल्यापुरते आपण पालन करतो आहोत.- प्रशांत स्वामी, पोलीस उपायुक्त

बीडमधून आलेले अंमलदार

बीड जिल्ह्यात काम केलेले काही अंमलदार शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ठाण्यांमध्ये रुजू झालेले आहेत. त्यांच्या गणवेषावरील नावपट्टीवर आडनाव नसल्याचे दिसत आहे.

आडनावविरहित नावपट्टीचे स्वागत

नावपट्टीवरील आडनावावरून जात, धर्माचीही ओळख होते. त्यावरून ‘जवळचा-दूरचा’ असा भेदही जपला जातो. शहर पोलीस दलातही ‘जवळचा-दूरचा’ असे संबंध जपले जात असल्याची चर्चा कायम होत असते. त्या अर्थानेच एखाद्याची नियुक्ती विशिष्ट ठिकाणी केली जाते किंवा उचलबांगडी केली जाते, असाही आरोप छुप्या पद्धतीने केला जातो. आडनाव लपत नसले, तरी शहर पोलीस दलातही नावपट्टीवरील आडनाव हटवण्याचे प्रारूप आले तर ते स्वागतार्ह होईल, असे मत काही कर्मचारी-अधिकाऱ्यांमधून व्यक्त केले जात आहे.