छत्रपती संभाजीनगर: महापालिकेने मालमत्ताकर वसुलीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मालमत्ताधारकांना विविध यासाठी विविध ‘डिजिटल पेमेंट’ पर्यायांचा वापर करून करभरणा करता येईल, असे मनपा प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले.

२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुलीचे ७०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. मागील वर्षी ५०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देऊनही दोनशे कोटी रुपयांची वसुलीही झाली नव्हती. त्यामुळे या वर्षी एप्रिलपासूनच मालमत्ताकर आणि पाणीपट्टी वसुलीकडे लक्ष केंद्रित केले आहे. मालमत्ता करसंकलन व निर्धारक अधिकारी तथा उपायुक्त विकास निवाळे यांनी पद्भार स्वीकारल्यानंतर करवसुलीसाठी कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवली आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना करवसुलीसाठी न ठेवता कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच ‘ऑनलाइन’ प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी संकेतस्थळावर बदल करण्यात आले आहेत. ‘डिजिटल पेमेंट’ ॲपमध्ये महापालिकेचे नाव टाकल्यानंतर , मोबाइल नंबर टाकावा, तसेच मालमत्ता क्रमांक टाकून कराची रक्कम जमा करावी, अशी सोय करण्यात आली आहे.

दोन महिन्यांत ४० कोटींची वसुली

मालमत्ताकर आणि पाणीपट्टीपोटी एप्रिल आणि २३ मेपर्यंत ४० कोटी रुपयांचा कर मालमत्ताधारकांनी भरला आहे. कर भरण्यासाठी मेअखेरपर्यंत दहा टक्के सामान्य करामध्ये सूट दिली जाणार आहे. ३८ हजार ८५१ मालमत्ताधारकांनी ३६ कोटी २३ लाख रुपये मालमत्ताकर आणि ४ कोटी ५३ लाख रुपयांची पाणीपट्टी भरण्यात आली आहे.