छत्रपती संभाजीनगर – झणझणीत, खमंग चुरमुरे-पोह्यांचा चिवडा, जोडीला शेव, करंजी, अनारसे, शंकरपाळे, बेसन-रवा-बुंदीच्या लाडवांनी सजलेलं फराळाचे ताट सुट्टीत घरी परतलेल्या महाविद्यालयीन मुलांना खुणावत असताना त्यावर ताव मारण्याची संधी साधायची की वर्षभर कधीही खाण्यास उपलब्ध आणि मेसच्या जेवणानंतर पोटाला आधार म्हणून जवळ करता येणाऱ्या लज्जतदार वडा-पावची आठवणही सध्या नकोशी झाली आहे.
दिवाळसणातील मिष्टान्नांची ओढ आणि सुटीसाठी गावी परतलेल्या मुलांमुळे वडा-पावच्या विक्रीत ३५ ते ४० टक्क्यांनी घट झाली असून, डिसेंबर महिना उजाडेपर्यंत व्यवसायात मंदीच राहणार असल्याचे वडा-पाव विक्रेत्या दुकानदारांचे मत आहे.
शाळा-महाविद्यालयांना १५ ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सुट्टया लागल्या आहेत. साधारण १५ ते २० दिवसांचा सुट्टयाकाल असून, ५ नोव्हेंबरनंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रथम सत्राच्या परीक्षांचा आरंभकाल सुरू होत आहे. डिसेंबर अखेरपर्यंत परीक्षांचा कालावधी आहे. सुट्टी संपताच परतणारी मुले घरून किमान आठवडाभर पुरेल एवढे फराळाचे जिन्नस, मिष्टान्न सोबत घेऊन येतात. त्या चवीपुढे वडा-पावकडचा मुलांचा ओढा कमी होतो, असे स्थानिक व्यावसायिकांचे निरीक्षण आहे.
दरवर्षीच सुट्टीच्या कालावधीत वडा-पावच्या व्यवसायात काहीसी मंदी येतेच. शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील दुकानांवरील गर्दी ओसरते. एरव्ही दररोज २२५ ते २५० लादी पावची गरज असते, आता दीडशेच्या आस-पास लाद्या मागवत आहोत. दररोज पाचशेपेक्षा अधिक वड्यांची घट आहे. – आकाश गायकवाड, वडा व्यावसायिक.
दिवाळीच्या चारच दिवसात बेकरीतील पावच्या मागणीत घट होते. साधारण ३० ते ३५ टक्क्यांची घट म्हणता येईल. परंतु घरात पावभाजी, बटाटे वडेही तळले जात असल्याने पावांची खरेदी होतेही. शैक्षणिक पूर्ण सुट्टीकालात मागणीत घट नसली तरी दिवाळीच्या चार दिवसात व्यवसायात मंदी असते. – अभिजित कुलकर्णी, बेकरी व्यावसायिक