भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी धमकी दिल्याचा आरोप अभिनेत्री उर्फी जावेदने केला आहे. यावर चित्रा वाघ यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी उर्फी जावेदला मी कुठलीही धमकी दिली नाही, असे स्पष्ट केले. “मी फक्त उर्फीला इशारा दिला आहे की, महाराष्ट्रात नागडी उघडी फिरू नको, असं सांगणं म्हणजे धमकी नाही. आमचा आक्षेप फक्त उर्फीच्या कपड्यावर आहे. इतर गोष्टींवर नाही. त्यामुळे माझा अजूनही तिला इशार आहे की, उर्फी जावेदने कपडे घालून रस्त्यावर फिरावे “, असंही चित्रा वाघ म्हणाल्या. चित्रा वाघ संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उर्फी जावेद भाजपमध्येच प्रवेश केला तर

संभाजीनगरमधील पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारले की, उद्या उर्फी जावेद भाजपमध्येच आली तर? काय कराल. यावर उत्तर देताना चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या. “असल्या नंगट लोकांसाठी भाजपामध्ये जागा नाही. तुम्हाला काय वाटतं. भाजपामध्ये लोक एका ध्येयासाठी काम करतात. या विषयाचा मजाक बनवू नका. आमच्यावर बोलतात, टीका करतात तेवढं ठिक आहे. पण आमच्या पक्षावर बोलू नका. माझ्या परिवारावर टीका करु नका.” यावेळी त्यांनी पत्रकार आणि विरोधकांच्या भूमिकेबाबतही खेद व्यक्त केला.

हे ही वाचा >> “आधी जरा हिंदू संस्कृती म्हणजे काय? याचा अभ्यास करा मग मला…” उर्फी जावेदचं चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर

चित्रा वाघ म्हणाल्या की, “माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. तरिही मी त्याला घाबरत नाही. मी माझ्या मुद्द्यावर ठाम आहे. मला लोक विचारत आहेत की, चित्रा वाघ उठली की उर्फीवर बोलत राहते. पण मी उर्फीवर उठसूठ बोलत नाही. मला प्रश्न विचारले जात आहेत, म्हणून मी उत्तरं देते. सार्वनजिक ठिकाणी नंगटपणा नको, हा एकच मुद्दा मी मांडला आहे. या राज्यात एका आईचा आवाज चित्रा वाघने उचलला असेल तर त्यात वावगं काय?”

दरम्यान चित्रा वाघ यांनी एवढा विरोध करुन सुद्धा उर्फी जावेदवर त्याचा काहीही एक परिणाम झालेला नाही. उलट उर्फी जावेदकडून प्रत्येकवेळी ट्विटरच्या माध्यमातून पलटवार करण्यात येत आहे. काल मुंबई पोलिसांकडे चौकशीसाठी जात असतानाही तिने जे कपडे घातले होते, त्याचा फोटो ट्विट करुन “एवढं पुरेसं आहे का?” असं कॅप्शन लिहिलं होतं. त्यानंतर आज हिंदू धर्मातील चालिरीतीवरुनही काही ट्विट्स केले होते. आज सकाळी पुन्हा एकदा कमी कपड्यांमध्ये फोटो शूट करुन त्याचाही फोटो उर्फीने ट्विट केला आहे.

हे वाचा >> विश्लेषण: ‘नंगटपणा’ मुळे उर्फी जावेदवर कारवाई होऊ शकते? अश्लीलतेबाबत कायदा काय सांगतो?

महिलेची छेड काढणाऱ्या एसीपीची हकालपट्टी करा

“संभाजीनगरमध्ये अतिशय संतापजनक अशी घटना घडली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानेच एका महिलेला त्रास दिला. सर्वात आधी असे हरामखोर पोलीस अधिकारी पोलीस दलात नको. पोलीस दलाला, महाराष्ट्राला त्यांची गरज नाही. त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी आणि त्यांना पोलीस दलातून काढून टाकावे”, अशी मागणी चित्रा वाघ यांनी संभाजीनगरमध्ये केली.

एसीपी विनयभंग प्रकरणात चित्रा वाघ यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेत या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आणि त्यानंतर पोलिसच जर असं करत असतील तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल उपस्थित केला. शिंदे – फडणवीस यांचे सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे. महिला-मुलींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय केली जाणार नाही. पोलिसांचे काम महिलांचे रक्षण करणे असतं. पण ज्या अधिकाऱ्याने शेण खाल्ले आहे, त्याला पोलिसदलात राहण्याचा अधिकार नाही. त्याच्या कुकर्माची शिक्षा त्याला मिळणारच. अशा अधिकाऱ्यांना घरी बसवा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chitra wagh again targate urfi javed over clothes at sambhaji nagar kvg