‘लोकसत्ता’च्यावतीने आयोजित चर्चासत्रात उद्योजकांची मागणी
औरंगाबाद : औद्योगिक वसाहतीतील समस्या आणि त्याची गाऱ्हाणी तर आम्ही मांडतोच. मात्र, औरंगाबाद शहरातून वाळूज एमआयडीसीमध्ये जाणारा रस्ता सुधारण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी औरंगाबाद येथे ‘लोकसत्ता’च्यावतीने उद्योजकांसाठी आयोजित केलेल्या विशेष चर्चासत्रात करण्यात आली. ‘एनकेजीएसबी बँक’ प्रस्तुत व एमआयडीसीच्या सहाय्याने ‘लोकसत्ता’च्यावतीने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राला ‘मसिआ’ संघटनेचे विशेष सहकार्य लाभले. उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन या वेळी उपस्थित होते. केवळ रस्तेच नाही तर पायाभूत सुविधांमध्ये कोणते आणि कसे बदल व्हावेत, याची चर्चा या वेळी उद्योजकांनी केली.
गुरुवारी कलाग्राम येथे लघु व मध्यम उद्योजकांसाठी आयोजित या चर्चासत्राच्या वेळी लघु व मध्यम उद्योजकांना कोणत्या आणि कशा अडचणींना सामोरे जावे लागते, हे लक्षात घेऊन आर्थिक विषयांतील तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले. या वेळी एनकेजीएसबीचे उपाध्यक्ष सुनील गायतोंडे यांनी लघु व मध्यम उद्योजकांसाठी एनकेजीएसबी बँकेकडून कशा प्रकारे भांडवल उभे करून दिले जाऊ शकते, याची माहिती दिली. बँकेसाठी लघु व मध्यम क्षेत्रात गुंतवणूक करणारा उद्योजक अधिक प्राधान्याचा आहे, असेही ते म्हणाले.
मुंबई शेअर बाजाराचे मुख्य समन्वयक अधिकारी नीरज कुलश्रेष्ठ यांनी शेअर बाजारात लघु व मध्यम उद्योजक उतरल्यास त्यांना कसा लाभ मिळू शकतो, हे सांगितले. या क्षेत्रातील उद्योजक स्वत:च्या कंपनीचा समभाग देणे म्हणजे कंपनीवरील आपली मालकी कमी होईल, या भीतीपोटी फारसा पुढे येत नाही. मात्र, अशी भीती बाळगण्याचे कारण नाही. स्वत:च्या कंपनीचे मूल्यांकन शेअर बाजारात होते. त्यामुळे अधिक गुंतवणूकदार पुढे येऊ शकतात. त्यासाठी कंपनीचे लेखे अधिक सजगपणे हाताळावे लागतात. तसे व्यावसायिक आता उपलब्ध आहेत. एखाद्या लघु, मध्यम उद्योजकास शेअर बाजाराच्या क्षेत्रात उतरायचे असेल, तर त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्याची सुविधाही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
‘मसिआ’ या लघु उद्योजक संघटनेचे सुनील कीर्दक, सीआयआय या औद्योगिक संघटनेचे सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी मराठवाडय़ातील लघु व मध्यम उद्योजकांपुढील अडचणींबाबतची माहिती उद्योगमंत्र्यांना दिली. विशेषत: शहरातील रस्त्यांच्या सुविधांबाबतची काळजी पालकमंत्री आणि उद्योगमंत्री म्हणून सुभाष देसाई यांनी घ्यावी, असे उद्योजकांनी आवर्जून नमूद केले.
या चर्चासत्रात उद्योगमंत्र्यांसमोर बोलताना सीआयआयचे सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी शहरातील रस्त्यांमुळे उद्योजकांसमोर कशा अडचणी येतात, हे आवर्जून नमूद केले. विविध देशांतून वाळूज औद्योगिक क्षेत्रास भेट देणाऱ्या अनेकांकडून खड्डय़ांमुळे मुख्य रस्त्यावरून जाताना होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले जाते. त्याचबरोबर औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांना नाश्ता व जेवण मिळण्यासाठी कॅफिटेरियासारख्या सुविधा एमआयडीसीने उपलब्ध करून द्याव्यात. तसे न झाल्याने टपऱ्यांसारखी दुकाने वाढतात आणि त्याचा लाभ होण्याऐवजी उपद्रव वाढतो. त्यामुळे प्रत्येक झोनमध्ये कॅफिटेरियाची गरज असल्याचे मत सीएमआयए या औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी प्रसाद कोकीळ यांनी व्यक्त केले. पी. अनबलगन यांनी अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करून देण्यासाठी सरकार सकारात्मक असेल असे सांगितले. पिंपरी-चिंचवडमध्ये अशा सुविधा निर्माण करून दिलेल्या आहेत. त्यामुळे इथेही त्या उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.