औरंगाबाद शहरात शुक्रवारी उशिरा रात्री आणखी दोन रुग्ण करोना चाचणीला सकारत्मक आले आहेत. यात शहरातील यादवनगर येथील २९ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तसेच ४० वर्षांचा महिलेचा समावेश आहे. यातील एकाचा समावेश पूर्वी दाखल रुग्णाशी संपर्क आल्याने तर अन्य एक जण दिल्ली येथून आलेली व्यक्ती आहे. त्यामुळे आता औरंगाबाद येथे आता १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या पूर्वी एका बँकेतील एकाचा करोनाबाधेनंतर मृत्यू झाला होता. तर एक महिला पूर्णत: बरी झाली आहे.

दरम्यान, ज्या भागात करोनाचे रुग्ण आढळले, त्या भागातील आरोग्य तपसणी वाढविण्यावर महापालिकेने जोर दिला आहे. रात्री साडेदहा वाजता रुग्णांचा अहवाल कोविड-१९ चाचणीला सकारात्क आल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील करोना रुग्णांची व्यवस्था असणाऱ्या मजल्यावर त्यांना हलविण्यात आले. त्यांना रात्रीतून औषधाची पहिली मात्राही देण्यात आली. शनिवारी सकाळच्या सत्रात आणखी सात जणांचे अहवाल नकारात्मक आले. शनिवारी दुपापर्यंत ३८ रुग्णांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले होते.

दरम्यान, ‘सारी’ आजाराच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांत १५ रुग्णांची भर पडली आहे. घरोघरी सर्वेक्षण केले जात असल्याने सर्दी, खोकला असलेले रुग्ण आहेत काय, याची चाचपणी केली जात आहे. पोलिसांनी सायंकाळी सात ते ११ या कालावधीमध्ये औषधी दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट असला तरी भाजीसाठी होणारी गर्दी मात्र अजूनही थांबलेली नाही. दरम्यान, भाजीचे दर घसरले आहेत. जिल्ह्य़ाबाहेर भाजी नेण्यास येणाऱ्या अडचणी आणि शेतकरी गटाकडून विक्री व्यवस्थेवर येणारी मर्यादा असल्याने मोठय़ा प्रमाणात दर घसरू लागले आहेत.