छत्रपती संभाजीनगर : पी. एचडी. करणारा उमर खालीद कारागृहात आहे. गौरीलंकेश आणि पानसरे यांना गोळी खावी लागली. कोणत्याही कारणाशिवाय काही माणसं कारागृहात रहावे लागते याचा खेद वाटायला हवा. म्हणून बोलायला हवे. कारण सध्या देश एका अस्थिर आणि विचित्र कालखंडातून जातो आहे. सत्ता आणि भांडवलदारांचे साटलोटं असणारी असणारी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे राईट आणि लेफ्ट विचारापेक्षा राईट आणि रॉग असा विचार लक्षात घेणारे कोण हे ओळखून कॉमरेड शब्द समजून घ्यावा लागेल, असे मत दिग्दर्शक वरुण सुखराज यांनी व्यक्त केले.
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज युनियन संलग्न बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद यांचे १४ वे द्विवार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून एमएसईएफ संघटनेचे सचिव एन. शंकर, जनरल सेक्रेटरी बीओएमओऐ कृष्णा बरूरकर, देविदास तुळजापूरकर, के. एन. थिगळे यांची उपस्थिती होती.
नेपाळ मध्ये ना बैठक, ना रॅली ना भाषणबाजी झाली. त्यानंतरही दोन दिवसात क्रांती घडून सत्तापालट झाली. आपल्या देशात ही प्रचंड अस्थिरता आहे. अशी परिस्थिती उदभवू नये यासाठी सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. उद्या भारत पाकिस्तान मॅच आहे पाकिस्तान विरोधात भारत जिंकेलच पण या अतिषबाजीत उमर खालेद, गौरी लंकेश आणि पानसरे यांचा विसर पडू नये असेही त्यांनी नमूद केले.
देशात बुवाबाजीचा बाजार आहे. भ्रष्टाचार हा मुद्दा नसून श्रध्देचा भांडवलवाद सुरु आहे. बुवाबाजीच्या नावाने हजारो कोटींचा बाजार मांडला. यातून सर्वसामान्य जनतेला ठगवले जात आहे. या विरोधात राजकीय लोक बोलत नाहीत. याची लाज वाटते ही शोकांतिका आहे असेही सुखराज म्हणाले, या वेळी कॉ. श्रीपाद अमृत डांगे हा पुरस्कार कामगार चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉ. मिलिंद रानडे यांना प्रदान केला.
स्मृती चिन्ह, ५० हजार आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. दिवसभरात बँक मित्र, बँक अधिकारी मेळावा मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृह सन्मित्र कॉलनी येथे पार पडला. अधिवेशनास सोलापूर मराठवाडा विभागातील महाराष्ट्र बँकेतील पाचशेवर कर्मचारी तसेच अखिल भारतातून महाराष्ट्र बँकेतील शंभरवर निमंत्रित उपस्थित होते. रविवारी अधिवेशनाच्या समारोपात मनोविकार तज्ञ डॉ. नंदकुमार मुलमुले मार्गदर्शन करणार आहेत.