शिवसेना राजकारणात पातिव्रत्य व सौभाग्य जपत आली आहे. राजकारणात होणारे अफेअर सेना सहन करणार नाही व महाराष्ट्राचे लफडा सदन होऊ देणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला इशारा दिला. आजही शिवसेना हाच मोठा भाऊ असल्याचा दावा करताना जनतेचा कौल चंचल असतो व बहुमत हे तात्पुरते असते, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
जिल्हय़ातील चाकूर, शिरूर अनंतपाळ, जळकोट व देवणी या चार नगरपंचायतींच्या निवडणूक प्रचारासाठी राऊत सोमवारी लातुरात आले होते. शासकीय विश्रामगृहावर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी व अॅड. बळवंत जाधव उपस्थित होते. राऊत म्हणाले, की शिवसेना आपली भूमिका सरकारमध्ये रोकठोक बजावत आहे. आमची बांधिलकी जनतेशी आहे. त्यामुळे जे सत्य आहे ते आम्ही बोलत राहणार. बोटचेपी भूमिका कधीही घेणार नाही. शिवसेनेची कोंडी कोणीही करू शकत नाही, त्यामुळे शिवसेनेला िखडीत पकडल्याचे स्वप्न कोणी पाहू नये. लातूरच्या महापौरांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे काँग्रेसने त्यांना तातडीने हाकलले पाहिजे. काँग्रेस पक्ष त्यांनाच महापौर ठेवणार असेल, तर तो लोकशाही, लातूरकरांचा, न्यायालयाचाही अवमान ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी उस्मानाबादमध्ये मित्रपक्षच शत्रूपक्ष बनत असल्याची टिप्पणी केली. त्याबद्दल बोलताना राऊत यांनी लोणीकर हे भाजपमध्ये कधी आले आहेत आपल्याला माहिती नाही. त्यांनी शिवसेनेचा अभ्यास करून बोलावे, असा सल्ला दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not lafda sadan of maharashtra of shiv sena