छत्रपती संभाजीनगर : अनेक शिवारांमध्ये अजूनही पाणी असल्याने पंचनामे करताना येणाऱ्या अडचणीसाठी ड्रोनची मदत घ्यावी. ते चित्रणही पंचनामा म्हणून ग्राह्य धरण्याच्या सूचना अंमलबजावणीमध्ये आणणे शक्य नसल्याचे प्रशासकीय यंत्रणेने सरकारला कळविले आहे. जरी ड्रोनने चित्रण केले तरी पिके पाण्यात आहेत, असे स्पष्ट चित्र त्यात दिसत नाही. केवळ हिरवी पिके दिसतात. त्यामुळे ‘ड्रोन’ ने पंचनामे करता येणार नाही, असे सरकारला कळविण्यात आले आहे.

लातूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर तातडीने पंचनामे व्हावीत म्हणून ड्रोनची मदत घेतल्यास तो पुरावाही ग्राह्य धरला जाईल, असे सांगितले होते. या अनुषंगाने जमाबंदी आयुक्तांना सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, ड्रोनच्या चित्रणाने पंचनामे केल्यास वस्तुस्थिती समजू शकत नाही. त्यामुळे ड्रोनच्या पंचनाम्याची कल्पना बाद ठरविण्यात आली आहे.

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना या अनुषंगाने विचारले असता ते म्हणाले, ड्रोनचा वापर फारसा उपयोगी पडत नसल्याचे दिसून येत आहे. ’ दरम्यान, पूर ओसरण्यास सुरुवात झाल्याने पंचनाम्यास आता वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत मराठवाड्यात ३१ लाख ९८ हजार ४७० क्षेत्रापैकी २३ लाख ६० हजार ३६८ हेक्टरावरील पंचनामे पूर्ण झाले असून, एकूण बाधित क्षेत्राच्या हे प्रमाण ७३.८० एवढे आहे.