औरंगाबाद शहरात करोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. करोनाबाधितांची संख्या ४९ एवढी झाली आहे. त्यातील २२ जणांना स्वगृही पाठविण्यात आले असले, तरी करोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या संपर्कातील लागण होण्याचा वेग वाढू लागला आहे. शनिवारी सकाळपर्यंत हिलाल कॉलनी भागातील एकाच कुटुंबातील तीन महिलांसह अन्य दोघांना संसर्ग झाला असल्याचे अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त  झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सुंदर कुलकर्णी यांनी दिली.  हिलाल कॉलनीमधील एका वृद्ध व्यक्तीचा करोनाची बाधा झाल्याने मृत्यू झाला होता. त्यांच्या घरातील तीन महिलांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या २४ तासांत सात जणांना करोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारी भीमनगर-भावसिंगपुरा व समतानगर भागात चार जणांना लागण झाल्याचे अहवाल आले होते. शहरातील समतानगर भागात सर्वाधिक आठ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या भागातून घराबाहेर कोणी पडू नये, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत आहेत. आतापर्यंत औरंगाबादमध्ये पाच जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. ४९ रुग्णांमध्ये पाच जणांचा मृत्यू हे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र झालेले मृत्यू वृद्ध व्यक्तींचे असून त्यांना मधुमेह उच्च रक्तदाब आदी आजार होते. असे असले तरी शहरात नाहक फिरणाऱ्यांचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

५५ वर्षांवरील सफाई कामगारांना सुट्टी

शहरातील सफाई कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा होऊ नये म्हणून विविध वॉर्डातील २२६ जणांना दहा दिवसांची सुट्टी द्यावी, असे आदेश महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या सहायक आयुक्तांनी दिले आहेत.

रिक्षाचालकास संसर्ग झाल्याने चिंतेत वाढ

आरेफ कॉलनी, किराडपुरा, यादवनगर, बायजीपुरा, बिसमिल्लाह कॉलनी, असेफिया कॉलनी, हिलाल कॉलनी, समतानगर, देवळाई, भीमनगर, पुंडलिकनगर हे भाग प्रतिबंधित आहेत. या भागात सर्वेक्षण केले जात आहेत. दरम्यान आसेफिया कॉलनीमध्ये करोनाबाधित असलेला तरुण रिक्षाचालक होता. त्याने या भागातील करोनाबाधितास रुग्णालयात नेले होते. आता त्याच्या संपर्कात आलेल्याचे भय वाढले आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five new patients in aurangabad abn