छत्रपती संभाजीनगर – लगीनसराईच्या हंगामात विवाहपूर्व चित्रीकरणाचे लोण आता (प्री-वेडिंग) ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या परिसरापर्यंत पोहोचले आहे. यंदा एक ते पाच मिनिटांपर्यंतच्या प्री-वेडिंगच्या रीलसाठीही पाऊण लाख ते अडीच लाखांपर्यंतची रक्कम लग्नाच्या एकूण जमाखर्चात समाविष्ट करावी लागत आहे.
किल्ले रायगड, किल्ले देवगिरी या ऐतिहासिक स्थळांच्या परिसरात, पैठणमधील नाथसागर, ज्ञानेश्वर उद्यान परिसर, अहिल्यानगरमधील भंडारदऱ्यासह काही निसर्गरम्य गाव-परिसरामध्ये सध्या प्री-वेडिंग चित्रीकरण वाढले आहे. सूर्योदय वा सूर्यास्ताची वेळ निवडून काही स्थळे ठरवली जात आहेत. स्थळांच्या बाबतही काही व्यवसायाकडून चित्रीकरणाचे दरही निश्चित केले जात असून, एका तासासाठी सातशे ते आठशे रुपये यानुसार दर ठरवण्यात येतो.
या व्यवसायाशी संबंधित अनेक पैलूंबाबत चित्रपट चित्रीकरणाचा अनुभव ते स्वत: या क्षेत्रात कार्यरत असलेले राजेश गठाडे म्हणाले, ‘प्री-वेडिंग हे साधारणपणे सधन घरातल्या मंडळींकडून केले जाते. हौसेला मोल नसते. वधू-वराचीही असे चित्रीकरण करण्याची इच्छा असते. लग्नासारख्या गोड सोहळ्याच्या आठवणींचा ठेवा म्हणून प्री-वेडिंगकडे कल वाढला आहे. या निमित्ताने वधू-वराची मने जुळण्याचाही भाग महत्त्वाचा ठरतो. पटकथा, गाण्यांची निवड यानुसार स्थळनिश्चिती, चित्रीकरण आणि छायाचित्रांसाठी अत्याधुनिक कॅमेरे, ड्रोनचा वापर केला जातो. त्यानंतर संपादनाचा भाग येतो. त्यातही क्रोमा-की, इफेक्ट अशी कलात्मकता जोडून चित्रफीत बनविली जाते. चित्रीकरणासाठी चार ते पाच जणांचा तंत्रज्ञ चमू सोबत असतो. हा सारा खर्च धरून प्री-वेडिंगचा दर ठरतो. पूर्वी लग्नानंतरचे चित्रीकरण व्हायचे. त्यात नवपरिणीत जोडप्यांची मने जुळल्याचा भाग आपोआप टिपला जायचा. आता लग्नापूर्वीच जोडीदारांची मने जोडण्यासाठी म्हणून प्री-वेडिंगला पसंती मिळत आहे.
साधारणपणे ७५ हजार ते अडीच लाख रुपयांचा खर्च एक ते चार-पाच मिनिटांच्या प्री-वेडिंगच्या चित्रफितीला येतो. मराठवाड्यासारख्या भागातही आता प्री-वेडिंग केले जात आहे. लग्नपत्रिकेसोबत किंवा प्री-वेडिंगमध्येच पत्रिका बसवून बनविलेली चित्रफीत पाठवून देण्याची नवी निमंत्रण पद्धतही रूढ होत आहे.- राजेश गठाडे, व्यावसायिक
