गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यतील सर्वच तालुक्यांत चांगला पाऊस झाल्याने पिकांसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली, तर शहरी भागातील जनजीवन मात्र विस्कळीत झाले. गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रात पडलेल्या या पावसामुळे धरणातील पाणी वाढल्याने शुक्रवारी सायंकाळी उशिरा विष्णुपुरी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले.
चार दिवसांपासून नांदेड शहरासह जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांत वरुणराजाने हजेरी लावली. यामुळे सद्य:स्थितीत पिकांसाठी हा पाऊस आवश्यक होता. तीन-चार वर्षांत उसनवारी करून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावरील कर्जाचे ओझे उतरण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येते. विशेषत: नांदेड शहरासह, लोहा, भोकर व अर्धापूर या तालुक्यांत पावसाने हजेरी लावत सरासरीच्या जवळपास झेप घेतली.
गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रात मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्याने शुक्रवारी सायंकाळी गोदावरी नदीवरील दिग्रस बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे विष्णुपुरी जलाशयात पाणी वाढले होते. त्यामुळे विष्णुपुरीचे चार दरवाजे शुक्रवारी सायंकाळी उघडण्यात आले होते. जलाशयाची पाणीपातळी ९० ते ९५ टक्के राखत हे प्रमाण कायम राहावे यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रतिसेकंद दोन हजार क्युसेक या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, गोदावरी नदीलगतच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश जलसाठे भरण्याच्या मार्गावर असल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यात आली, तेथील जलाशयाच्या पाणीसाठय़ात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.