धाराशिव: महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिर आणि मंदिराबाहेरील महत्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुरातत्व विभागाकडून ही कामे केली जाणार आहेत. मंदिराच्या जीर्णोध्दारासह या विविध कामांचा शुभारंभ दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर केला जाणार आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, लोकप्रतिनिधी आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. ओम्बासे यांनी तुळजाभवानी मंदिर आणि परिसरातील जीर्णोध्दाराच्या कामाबाबत सुरू असलेल्या प्रक्रियेची माहिती दिली. मंदिर समितीच्या स्वतःच्या निधीतून ५८ कोटी रूपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पावसाळ्यानंतर शारदीय नवरात्रोत्सवातील सर्व कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोध्दाराची कामे हाती घेतली जाणार असल्याचे ओम्बासे यांनी सांगितले. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येेणार्‍या भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पुढील पाचशे वर्षांचा विचार करून मंदिर परिसरातील नव्याने केलेले बांधकाम व अनावश्यक कामे काढून परिसरातील विकासात्मक कामे पुरातत्व विभागाकडून करण्यात येणार आहेत. यासाठी ५८.१२ कोटींच्या ऑनलाईन निविदा मागविल्या असून पुढील १५ दिवसांत कार्यारंभ आदेश निघणार आहे.

हेही वाचा : मराठवाड्यात पावसाचा कहर; तीन ठार, ८० जनावरे वाहून गेली तर १३५ घरांची पडझड

मुख्य मूर्तीला धक्का न लावता पुरातत्त्व विभागाकडून बांधकाम शैलीचे स्वरूप कायम ठेवत कोणताही बदल न करता दुरुस्ती करण्यात येणार आहे. बाराव्या शतकातील असलेल्या दगडी खांबाच्या दगडांना चिरे पडले असून पुरातत्व खात्याकडून दुरुस्ती व परिसराची व्याप्ती वाढण्यासाठी परिसरातील नवीन व अनावश्यक बांधकामे काढण्यात येणार आहेत. ही कामे अतिशय काळजीपूर्वक करण्यात येणार असल्याने या कामांना चार-पाच वर्षे अवधी लागण्याची शक्यता आहे. परंतु देवीचे दर्शन सुरू राहणार असून टप्प्याटप्प्याने ही कामे करण्यात येणार आहेत. दर्शनानंतर भाविकांना बाहेर पडण्यासाठी आणखी दोन-तीन ठिकाणी एक्झिट संख्या वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या परिसरात असलेल्या क्रीडांगण, पोलीस चौकी पाडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी संजयकुमार ढवळे, मंदिर व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने, तहसीलदार अरविंद बोळंगे, सहाय्यक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, गणेश मोटे, राजकुमार भोसले, प्रवीण अमृतराव, जयसिंग पाटील उपस्थित होते.

हेही वाचा : परभणी : पुराच्या पाण्यात एसटी बस गेली वाहून, मानवत तालुक्यातील घटना

अशी आहेत कामे

तुळजाभवानी मंदिर संस्थानने काढलेल्या प्रस्तावित विकासकामांमध्ये मंदिर परिसरातील नव्याने केलेले बांधकाम काढून भुयारी मार्ग, मंडप सभा मंडप व भवानी शंकर मंदिर जतन दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामांसाठी ११ कोटी ३६ लाखांचा निधी खर्च होणार आहे. तसेच परिसरातील कार्यालयीन इमारत, प्रशासकीय इमारत, पोलीस चौकी, स्टेडियम इत्यादी नव्याने केलेले बांधकाम काढणे, गोमुख तीर्थ, दत्त मंदिर, मातंगी मंदिर, कल्लोळ तीर्थ निंबाळकर द्वार, मार्तंड ऋषी मंदिर, शिवाजी महाराज व ओवर्‍या, खंडोबा मंदिर, यमाई मंदिर जतन व दुरुस्तीसाठी १० कोटी ५५ लाख, मंदिर व मंदिर परिसर विकास आराखड्याअंतर्गत परिसरातील तुकोजी बुवा मठाकडील दगडी संरक्षण भिंत, दगडी फरशी आवश्यकतेनुसार दगडी पायर्‍या, महावस्त्र अर्पण केंद्र जतन दुरुस्ती किंमत नऊ कोटी २७ लाख, स्मारक परिसरातील तुकोजी बुवा मठावरील ओवर्‍या, आराध खोल्यावरील ओवर्‍या, महाराज खोली दगडी फरशी जतन दुरुस्ती १५ कोटी १० लाख, स्मारकाचा मंदिर व मंदिर परिसर विकास आराखड्याअंतर्गत स्मारक परिसरातील मुख्य प्रवेशद्वार तसेच जिजामाता महाद्वार जतन दुरुस्तीसाठी सात कोटी ३० लाख, स्मारक परिसरातील लिफ्ट तसेच रॅम्प तयार करणे जतन दुरुस्ती चारकोटी २० लाख एकूण ५८.१२ कोटी खर्च मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dharashiv tulja bhavani temple restoration ahead of dussehra 2024 58 crores sanctioned css