सुहास सरदेशमुख

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा आणि दुष्काळ हे पूर्वापारचे समीकरण. त्यामुळेच दुष्काळग्रस्त, टँकरग्रस्त क्षेत्र ही मराठवाडय़ाची ओळख बनली. ओघानेच गरज म्हणून टँकरनिर्मितीचा व्यवसायही याच भागात उभा राहिला. पूर्वी नगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये टँकरनिर्मिती होत होती, आता बीड जिल्ह्यातील मादळमोही गाव हे टँकरनिर्मितीचे केंद्र बनले आहे.

पत्रा झाळण्याचा एकसुरी आवाज, लोखंडी पत्र्याला बांगडीप्रमाणे गोल वाकवण्याच्या कामात गुंतलेले मजूर हे मादळमोही (गेवराई तालुका) गावात दृष्टीस पडते. केवळ १५ हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावात जूनपासून म्हणजे अगदी मोसमी पाऊस सुरू असतानाच गॅरेजचे मालक टँकरनिर्मितीच्या कामाला हळूहळू सुरुवात करतात. सध्या मराठवाडय़ाच्या दुष्काळी भागात १८६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मराठवाडय़ाच्या मध्यम धरण प्रकल्पांत ४०.७६ टक्के पाणीसाठा आहे. आता दुष्काळाची दाहकता वाढू लागल्याने मादळमोहीतील टँकरनिर्मितीने वेग घेतला आहे.

हेही वाचा >>>बीड-नगर मार्गावर भीषण अपघात; वडील-मुलासह पाच जणांचा मृत्यू

मराठवाडय़ात २०१६ मध्ये ४०१६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. आताही मराठवाडा पुन्हा टँकरवाडा बनल्यात जमा आहे. पूर्वी दुष्काळी मराठवाडय़ाला नगर जिल्ह्यातील ठेकेदारांकडून टँकर पुरविले जात होते. त्यामुळे राहुरीमधील गॅरेजमध्ये टँकरनिर्मिती होत होती. मात्र, आता टँकर बनविण्याचे केंद्र म्हणून मादळमोही हे गाव प्रसिद्धीस आले आहे.

गावात जाताना कोणत्याही गॅरेजकडे नजर टाकली तरी टँकरचा लोखंडी लांबकुळा भाग दिसतो. आता बुटीबोरीहून झाळण्यासाठी येणाऱ्या कांडय़ांचा व्यापारही वाढत आहे. गेली १२ वर्षे टॅँकरनिर्मितीच्या व्यवसायात असलेले फिरोज खान म्हणाले, ‘‘पूर्वी आमचे गाव मालमोटारी बनविण्यासाठी प्रसिद्ध होते. चारचाकी गाडय़ांच्या चेसीसवर लाकडी फळय़ा लावणारे, पूर्ण मालमोटार तयार करणारे कुशल मजूर येथे होते. पण दुष्काळ कायमस्वरूपी मुक्कामी आल्याने आता आम्ही टँकर बनवतो. लोखंड महागले आहे, त्यामुळे एक लाख दहा हजार रुपयांचा टँकर आता दीड लाख रुपयांवर गेला आहे. दर वाढले तरी टँकरची मागणीही वाढतेच आहे.’’

दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाडय़ातल्या गॅरेज मालकांनी काळाची पावले ओळखून टँकर निर्मितीचे कौशल्य आत्मसात केले. आता मादळमोही गावात मोठय़ा प्रमाणावर टँकरनिर्मिती केली जाते. प्रत्येक गॅरेजवर काही कामगार झाळण्याचे यंत्र हातात घेऊन बसलेले असतात. साधारणत: एका गॅरेजवर आठ ते दहा जणांना रोजगार मिळतो. हे काम करणारे ५० हून अधिक कुशल कामगार मादळमोही गावात आहेत.

अनेक टँकरनिर्मिती व्यावसायिकांनी बँकांकडून कर्जेही घेतली आहेत. त्याबद्दल ‘मादळमोही अर्बन’ ही सहकारी बँक चालविणारे संदीप आंधळे म्हणाले, ‘‘पूर्वी आमच्या गावात मालमोटारी बांधल्या जात. त्यासाठी गॅरेजमालक कर्जे घेत. पण २०१२ पासून टँकरनिर्मितीचा व्यवसाय वाढला. आता हे व्यावसायिक अधिक कर्जे घेत आहेत.’’

हेही वाचा >>>घाटी रुग्णालयात सुरक्षा वाऱ्यावर? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ‘या’ VIDEO वरून महाविकास आघाडी संतप्त

टँकरची मागणी वाढतीच.

टँकरला लागणाऱ्या पत्र्याचे दर प्रतिकिलो ७२ ते ७५ रुपयांपर्यंत गेले आहेत. लोखंड महागल्यामुळे एक लाख दहा हजार रुपयांचा टँकर आता दीड लाख रुपयांवर गेला आहे. तरीही मागणी वाढतच आहे. कमी पावसामुळे आतापर्यंत मादळमोहीतून २० हून अधिक गॅरेज मालकांनी सरासरी प्रत्येकी २० टँकरची विक्री केली आहे. या गावाच्या दोन्ही बाजूंना ‘येथे टँकर बनवून दिले जाईल’, असे डिजिटल फलक लावण्यात आले आहेत.

टँकर बनविण्याची प्रक्रिया..

शासकीय टँकरमध्ये २२ हजार लीटर पाणी मावेल, इतका आकार असतो. दहाचाकी आणि सहाचाकी वाहनांवर टँकर ठेवण्यासाठी जेसीबीचा वापर होतो. टँकरसाठी तीन ते चार मिलीमीटर जाडीचा २१ फुटाचा एक पत्रा वाकवला जातो. तो बांगडीच्या आकारात वळवून दोन टोके झाळली जातात. तीन भाग एकमेकांना जोडून टँकर बनतो. पत्रा वाकविण्यासाठी मजूर संख्या जरा जास्त लागते.

पूर्वी नगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये टँकरनिर्मितीचा व्यवसाय चालत होता. मात्र आता टँकर बनवण्याचे केंद्र म्हणून बीड जिल्ह्यातील मादळमोही हे गाव प्रसिद्ध झाले आहे..

पाऊसमान आणि टँकर

’सन २००९-१० मध्ये औरंगाबाद विभागात ११८ टक्के पाऊस झाला होता, तेव्हा ४१२ टँकरने पाणीपुरवठा होत होता.

’२०१४-१५ आणि २०१५-१६ मध्ये अनुक्रमे ५३ आणि ५६ टक्के पाऊस झाला. त्यामुळे ४०१५ टँकरने पाणी पुरवण्यात आले.

’२०१८-१९ मध्ये ६४ टक्के पाऊस पडला तेव्हा टँकरची संख्या ३५४५ एवढी होती. याही वर्षी हिवाळय़ातच १८६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

मादळमोहीसारख्या छोटय़ाशा गावात २०१२ सालानंतर टँकरची मागणी वाढली. त्यामुळे टँकरनिर्मितीचा व्यवसायही वाढला. २०१६ मध्ये हा व्यवसाय तेजीत होता. आताही तो वधारेल अशीच चिन्हे आहेत. – फिरोज शेख, टँकरनिर्मिती व्यावसायिक