नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठापासून जवळच असलेल्या खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या पाचपैकी चार युवकांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी १०च्या सुमारास उघड झाली. मृत पावलेले चारही तरुण बारावीत शिकत होते.

नांदेड शहरातील देगलूर नाका भागातील काझी मुजम्मील, अफान, सय्यद सिद्दीकी, शेख खुजायल व महम्मद फैजान हे पाच जणं सोनखेड पोलीस स्थानकाच्या हद्दीतील झरी येथील खदानीच्या परिसरात गेले होते. तेथे पावसामुळे निर्माण झालेल्या तळ्यात पोहण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. त्यांतील काझी मुजम्मील, अफान, सय्यद सिद्दीकी, शेख खुजायल हे चौघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले; पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे हे चौघेही बुडाले व मो.फैजान हा पाण्यात न उतरल्यामुळे बचावला.

हेही वाचा : मराठवाड्यातील भाजपच्या आमदारांसमोर ‘मराठा मतपेढी’चे आव्हान

वरील चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती देगलूर नाका परिसरात समजल्यावर त्या भागावर दूपारनंतर शोककळा पसरली. घटनेची माहिती समजताच अपर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, सोनखेडचे सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. चारही तरुणांचे मृतदेह गोदावरी जीवरक्षक दलाच्या पथकाने ३० फूट खोल पाण्यातून बाहेर काढले. यात गोदावरी जीवरक्षक दलाचे स. नूर स. इकबाल, शे.हबीब, स.इकार स.नूर, शे.लतीफ शे.गफार, म.सलीम म.युनुस, गुड्डू किशन नरवाडे हे जीवरक्षक सामील होते.