छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षपदी किशोर शितोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुन्हा एकदा अध्यक्षपद कायम राहावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या बोरळकर यांच्या ऐवजी या पदासाठी अन्य कोणाचीही नियुक्ती करावी, अशी मागणी केली जात होती. अध्यक्षपदासाठी नवा चेहरा द्यावा, अशी विनंती खासदार डॉ. भागवत कराड यांनी नेतृत्वाकडे केली.
भाजपमधील जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये काही नवे चेहरे द्यावेत, अशी चर्चा सुरू झाली होती. मंत्री अतुल सावे यांनी मात्र, आहे ते पद आहे त्या व्यक्तीकडेच असावे असा आग्रह धरला असे सांगण्यात येते. मात्र, शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी किशोर शितोळे यांची नियुक्ती करण्यात आली. किशाेर शितोळे हे देवगिरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्याबरोबर संघटन बांधणीमध्ये ते अग्रेसर होते.
सहकार आघाडीमध्ये सक्रिय असणाऱ्या शितोळे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये उमदेवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, संभाजीनगर पश्चिम हा मतदारसंघ आरक्षित असल्याने त्यांना संधी उपलब्ध नव्हती. शितोळे यांच्या नियुक्तीचे स्वागत केले जात आहे. नियुक्तीनंतर ‘लोकसत्ता’शी बोलताना शितोळे म्हणाले की, पुढील काळात सर्वांना बरोबर घेऊन महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचा महापौर बसविण्यासाठी प्रयत्न करणे हे उद्दिष्ट असणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे.