औरंगाबाद : जिन्सी ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्यावर मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास ठाण्यातच मुजाहेद शेख नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने चाकू हल्ला. या घटनेत केंद्रे हे गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना एका खासगी दवाखान्यात हलवण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे हे मागील तीन वर्षांपासून जिन्सी पोलीस ठाण्यात कर्त्यावर आहेत. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे केंद्रे ठाण्यात कर्तव्य बजावत होते. याच दरम्यान त्यांच्याच ठाण्यात काम करणाऱ्या मुजाहेद शेख याने वाद घालायला सुरुवात केली. त्याला समजून सांगण्याचे प्रयत्न सुरू होते. इतर कर्मचारीही त्याला समजावत होते. या दरम्यानच मुजाहेद याने अचानक धारधार चाकू काढला व केंद्रे यांच्या पोटात खुपसला. त्याने तब्बल दोन वेळेस वार केल्याने केंद्रे गंभीर जखमी झाले. रक्तबंबाळ होऊन ते जमिनीवर कोसळले. सहकाऱ्यांनी धाव घेत त्यांना जवळच्या अॅपेक्स या खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती कळताच पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्या सह सर्व पोलीस अधिकारी रुग्णालयात दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. हल्ला करणारा पोलीस कर्मचारी मुजाहेद शेख याला नशेच्या गोळ्या घ्यायचे व्यसन असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Knife attack by cop on inspector in jinsi police station zws
First published on: 21-06-2022 at 22:55 IST