छत्रपती संभाजीनगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना या संदर्भाने आठवडाभरात आचारसंहिता लागू होण्याची चर्चा सुरू असतानाच थेट कर्जवाटप आणि स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. आज (शनिवारी) हा मेळावा भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गतच घेतला जात असून, त्यामध्ये भाजपची मतपेढी असलेला ओबीसी आणि सूक्ष्य ओबीसी घटक जोडलेला आहे. या घटकातील लाभार्थ्यांसाठीचा हा मेळावा असणार आहे, असे यासंदर्भाने प्रकाशित केलेल्या निमंत्रण पत्रिकेवरून स्पष्ट होते आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत या विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यासाठी हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यातून वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत येत असलेल्या राजे उमाजी नाईक, पैलवान कै. मारूती चवहाण-वडार महामंडळ, ब्रह्मलिन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज, श्रीकृष्ण, श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज व विणकर समाज आर्थिक महामंडळासह महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातील १४ संस्थांमधील लाभार्थ्यांना मंजूर १५ लाखांपर्यंतच्या कर्जाचा १२ टक्के व्याज परतावा, एक लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज व थेट कर्ज मंजुरी या तीन योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह जिल्ह्याचे खासदार संदिपान भुमरे व इतर आमदारांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे कळवण्यात आले आहे. या मेळाव्याकडे निवडणुकीच्या तोंडावर जवळपास २० महामंडळाशी संबंधित घटकवर्गाला कर्जवाटप, व्याज परतावा आणि थेट कर्ज मंजुरीचा लाभ देऊन खूश करण्याचा भाग मानला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यातील इतर बहुजन कल्याण विभागांतर्गत येत असलेल्या योजनांच्या संदर्भाने शनिवारी कर्जवाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. कोणत्याही उद्योगासाठी बँकेकडून मंजूर १५ लाखांपर्यंतच्या कर्जाचा १२ टक्के व्याजाचा परतावा पत्र (सशर्त हेतू पत्र), थेट कर्ज योजना व एक लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्याच्या योजनांचा समावेश मेळाव्यात असणार आहे. – रवींद्र पेठकर, व्यवस्थापकीय संचालक.