छत्रपती संभाजीनगर : दिवाळी सणाची सुरुवात गो पूजनाच्या ज्या वसुबारसपासून होते, त्याच्या आदल्या दिवशी तरी सहा महिन्यांपासून रखडलेले अनुदान मिळेल, अशी आशा राज्यातील गोशाळा संचालकांना होती. परंतु गोशाळांचीही दिवाळी अनुदानाविना अंधारातच गेली.
राज्य सरकारने अनुदान सुरू केल्याने गोशाळांना दान देणाऱ्या हातांनीही आखडता हात घेतला असून, मदतीविना गायींचे पालन-पोषण एक कसरत होऊन बसली असल्याचे गोशाळाचालकांचे म्हणणे आहे.
गोशाळांना प्रतिगाय प्रतिदिन ५० रुपये, तर मासिक दीड हजार रुपये अनुदान मिळते. एका गायीवर दिवसभरात १५० ते २०० रुपये चारा-पाण्याचा खर्च येतो. कडब्याची ४ ते ५ किलोची एक पेंडी ३० रुपयांना झाली आहे. काही दात्यांच्या मदतीने २०० ते ५०० गायींची गोशाळा चालवणे ही जगन्नाथाचा रथ ओढल्यासारखा आहे. पण फूल ना फुलाची पाकळी या न्यायाने काही तरी शासन देते आहे, याचे समाधान असले, तरी अनुदान वेळेत मिळत नसल्याने अडचण येते, असे गोशाळाचालकांचे मत आहे.
अनेक गोशाळाचालकांनी ऊन, पाऊस, थंडी यापासून गायींचा बचाव करण्यासाठी कर्ज काढून निवारा उभारला आहे. काहींनी तर ३०-४० लाखांचे कर्ज घेतलेले असून, व्याजाचा भार पेलवत गोशाळेचा डोलारा सांभाळावा लागत असल्याचाही सूर उमटत आहे.
सहा महिन्यांपासून अनुदान रखडले
राज्यात एकूण १ हजार ५० वर गोशाळा आहेत. त्यातील ६५८ गोशाळा अनुदानित आहेत. ३ वर्षांवरील वयाचे ८० हजारांवर गोधन गोशाळांमध्ये आहे. प्रतिगाय प्रतिदिन ५० रुपये अनुदान शासनाकडून दिले जाते. एप्रिल ते सप्टेंबर २०२५ पर्यंतचे अनुदान रखडले आहे. – उल्हास बोराळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, गोशाळा महासंघ, महाराष्ट्र.
दात्यांचा हात आखडता
शासनाकडून गोशाळांना अनुदान मिळतेय म्हणून खासगी दात्यांकडून आखडता हात घेतला जात आहे; पण अनुदानही वेळेवर मिळत नाही. थोडक्यात, दानही नाही, अनुदानही नाही. शिवाय काही गोशाळा कर्ज काढून चालवल्या जात आहेत. निवारा उभारण्यासाठी कर्जेही काढलेली आहेत. – माणिकराव रासवे गुरुजी, गोशाळाचालक, रामेटाकळी.
