छत्रपती संभाजीनगर – प्रवासी बॅगमधून अवैधरित्या गांजाची विक्री करणारा आरोपी इरफान खान मासुम खान (३७, रा. फातिमा नगर, हर्सूल) याला १० वर्षे सक्तमजुरी आणि १ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पवार यांनी शनिवारी सुनावली.
ही कारवाई अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाच्या कक्षाकडून (एनडीपीएस सेल) ७ जून २०२३ रोजी केली होती. आरोपी इरफान खान याच्याकडून २२ किलो १६० ग्रॅम गांजासह ४ लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला होता.
प्रकरणात एनडीपीएस सेलचे मंगेश ज्ञानदेव हरणे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, घटनेदिवशी रात्रगस्ती दरम्यान पोलीस अंमलदार धर्मराज गायकवाड यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती लाल रंगाच्या प्रवाशी पिशवीत गांजा घेऊन शनिआश्रम, चिखलठाणा मार्गावर येणार आहे. या माहिती आधारे सकाळी १० वाजता शनिमंदीर–जालना रोडजवळ पथकासह ज्ञायवैज्ञानिक प्रयोग शाळेचे अधिकारी यांनी संयुक्त सापळा रचला.
तेवढ्यात रिक्षातून उतरलेला व्यक्ती मोठी ट्रॅव्हल बॅग घेऊन उभा राहिला. पथक जवळ जाताच तो घाबरला व पळण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांनी त्याला थांबवत ओळख विचारली असता त्याने स्वतःचे नाव इरफान खान असे सांगितले. त्याची झडती घेतली असता पिशवीत ११ रॅपर मधून एकूण २२ किलो १६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. प्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासात दोन आरोपींची नावे
तपासादरम्यान आरोपी इरफान याने त्याच्याकडील गांजा हा मोहम्मद मुश्ताक याच्या सांगण्यावरुन आरोपी सादिक याच्याकडून विकत आणला. त्यानुसार पोलिसांनी मोहम्मद मुश्ताकला पण अटक केली. मात्र सादिक याचा आजपर्यंत सुगावा लागू शकला नाही.
नऊ साक्षीदारांची साक्ष
प्रकरणात तपास अधिकारी तत्कालीन पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहाय्यक लोकाभियोक्ता बी. आर. लोया यांनी नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यात न्यायवैज्ञानिक प्रयोग शाळा अधिकारी डॉ. संतोष कोते यांची साक्ष महत्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी इरफान खान याला दोषी ठरवून १० वर्षे सक्तमजुरी आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त एक वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे. तर आरोपी मोहम्मद मुश्ताक याची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. प्रकरणात माहिती पुरवणारे अधिकारी (पैरवी) म्हणून हवालदार आर. आर. गुव्हाडे यांनी काम पाहिले.
