छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात ध्वजारोहणानंतर ओबीसी आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या भाषणा दरम्यान काळे कापड फडकावून सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सरकार ओबीसी समाजावर अन्याय करत असल्याने सरकारचा निषेध करत असल्याच्या घोषणा त्यांनी दिल्या. पोलिसांनी तीन आंदोलकांना ताब्यात घेतले. केवळ प्रसिद्धीसाठी दोन – तीन घोषणा करतात हे मराठवाडा मुक्ती दिनी होते आहे, याचे मला दु:ख होते आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हैदराबाद मुक्ती संग्राम दिनी छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी सकाळी ९ वाजता ध्वजारोहरण झाले. तत्पूर्वी पोलीस दलाने या लढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अपर्ण केली. बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. दरवर्षी होणाऱ्या या सोहळयानंतर मुख्यमंत्री भाषणाला उभे राहिले. पहिले तीन – चार वाक्य झाल्यानंतर ओबीसी समाजावर अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध असे म्हणत दोन जण उभे राहिले. पाठिमागून आणखीही एक घोषणा करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी या आंदोलकांना पकडले. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या हैदराबाद गॅझेटिअरचा शासन निर्णय रद्द करावा, अशी आंदोलकांची मागणी होती, असे सांगण्यात आले.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण चालूच ठेवले. या घटनेनंतर पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘पोलिसांनी तातडीने या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. तीन आंदोलक असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षा विषयक त्रुटींवर बोट ठेवले जात आहे. सिद्धार्थ उद्यानात जाताना येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी पोलीस करत होते. केवळ सुरक्षा पास असणाऱ्यांनाच सोडले जात होते. अगदी खिशातील प्रत्येक बाब तपासली जात होती.

मराठवाडा मुक्ती दिनी शक्यतो आंदोलन होणार नाही, असे वातावरण असते. या वेळी मात्र पहिल्यांदा ध्वजारोहण संमारंभ स्थळी आंदोलक शिरल्याचे दिसून आले. ‘सुरक्षा विषयक राहिलेल्या त्रुटीबाबत चौकशी करुन कारवाई केली जाईल ’असेही अतुलकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. केवळ प्रसिद्धीसाठी काही जण असे प्रकार करत असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्ती दिनी अशी आंदोलने होत असल्याच्या बद्दल आपल्याला दु:ख वाटत आहे. या पेक्षा मला यात आणखी काही म्हणायचे नाही, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी भाषण चालू ठेवले.