जालना : पाहुणे येतात आणि जातात. परंतु भारतीय जनता पक्ष एकनिष्ठ कार्यकर्त्यांनाच चालवायचा आहे, असे वक्तव्य आमदार बबनराव लोणीकर यांनी अन्य पक्षांमधून आलेल्यांना उद्देशून रविवारी येथे केले.

मोदी सरकारची अकरा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जालना जिल्हा भाजप कार्यालयात रविवारी पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेत बोलताना ते म्हणाले, सध्या आपल्या पक्षात पाहुण्यांची गर्दी झाली आहे. मंत्रिमंडळात गर्दी झाली आहे. गावपातळीवरही पाहुण्यांची गर्दी झाली आहे. परंतु, पक्ष आपल्यालाच चालवायचा आहे, हे एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे.

जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपला सामना कदाचित मित्रपक्षांसोबतही होऊ शकतो, असे सांगून लोणीकर म्हणाले, मित्रपक्षांची साथ मिळाली नाही तर आपण स्वबळावर निवडून येण्याची तयारी ठेऊ. जिल्हा परिषदेत भाजपचे तीस सदस्य निवडून आले तर सत्तेसाठी आपल्याला कुणाच्याही कुबड्यांची गरज भासणार नाही. त्यासाठी कदाचित आपल्यासमोर मित्रपक्षांचेही आव्हान असू शकेल.

रावसाहेबांसोबतचे मतभेद पक्षाच्या चौकटीतील

रावसाहेब दानवे आणि आपल्यात पाच-सहा वर्षे पक्षांतर्गत काही मतभेद होते. परंतु, ते पक्षातील चौकटीत होते. आम्ही दोघांनी ठरविले तर जालना महानगरपालिका भाजपच्या ताब्यात येऊ शकते. आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही गावांत पक्षातील कार्यकर्त्यांत मतभेद असतील तर ते मिटवून टाका, असे आवाहनही आमदार लोणीकर यांनी केले.

लोणीकर यांचे अनेक महिन्यांनंतर मार्गदर्शन

रावसाहेब दानवे यांचे वर्चस्व असलेल्या भाजपच्या जिल्हा कार्यालयात गेली काही वर्षे लोणीकर यांचे जाणे-येणे नसल्यासारखेच होते. मोदी सरकारला अकरा वर्षे झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी अनेक महिन्यांनंतर त्यांचे या कार्यालयात मार्गदर्शन झाल्याचे जिल्हा पातळीवरील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

दानवे पिता-पुत्र मराठवाड्याबाहेर मोदी सरकारला ११ वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे अनुपस्थित होते. रावसाहेब दिल्लीत असल्याने तर संतोष दानवे पंचायतराज विधिमंडळ समितीच्या दौऱ्यानिमित्त मराठवाड्याच्या बाहेर असल्याने हजर नव्हते, असेही पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.