फौजदाराला मारहाणीप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांना एक वर्षांची शिक्षा, औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्र्यांचा ताफा येणाऱ्या मार्गावरील वाहतूक थांबवलेली असताना त्यातून जाण्यासाठी हट्ट धरत मज्जाव करणाऱ्या फौजदाराच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून सहकाऱ्यांच्या साथीने त्याला मारहाण केल्याप्रकरणात आमदार हर्षवर्धन जाधव यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वेगवेगळ्या कलमांखाली प्रत्येकी एक वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. हर्षवर्धन जाधव हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असतानाची ही घटना असून ते आता शिवसेनेचे कन्नड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत.

पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेतले. त्यानंतर खुलताबाद पोलिसांत जाऊन कोकणे यांनी मारहाण केल्याची तक्रार दिली. घटनेचा तपास करणारे पोलीस निरीक्षक डी. एम. ऐरोळे यांनी १० मार्च २०११ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा व सत्र न्यायालयात न्या. आर. आर. काकाणी यांच्यासमोर सुनावणी झाली. साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीवरून आमदार जाधव यांचा गुन्हा सिद्ध झाला असून त्यांना सरकारी कामात अडथळा व कर्मचाऱ्याला मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी दोषी धरत दोन्ही कलमांनुसार प्रत्येकी एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी ५ हजार दंडाची शिक्षा न्या. काकाणी यांनी सुनावली. घटनेप्रसंगी आ. जाधव यांच्यासोबत असलेले संतोष जाधव व तत्कालीन मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांची मुक्तता केली आहे. दरम्यान, जाधव यांनी दंडाचे १० हजार रुपये भरले असून त्यांनी उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी वेळ मागितल्याने त्यांच्या शिक्षेला महिनाभरासाठी स्थगिती देण्यात आली आहे.

प्रकरण काय?

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एक शासकीय बैठक होती. त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासाठी इदगाह टी पॉइंटवर सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत देवराव कोकणे यांनी इतर वाहनांची वाहतूक थांबवली होती. ही वाहतूक व्यवस्था मोडून आमदार हर्षवर्धन जाधव हे आपल्या गाडीने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या दिशेने निघाले असताना जाधव यांची गाडी कोकणे यांनी अडवली. आमदार जाधव यांनी कोकणे यांच्यावर गाडी नेली. त्यानंतर आमदार जाधव व त्यांचे सहकारी संतोष जाधव व दिलीप बनकर या तिघांनी मिळून  सूर्यकांत कोकणे यांनी मारहाण केली. शिवाय कांचन शेळके व शायना शेख या महिला पोलिसांनाही धक्काबुक्की केली.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla harshvardhan jadhav