छत्रपती संभाजीनगर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील भोईवाडा भागात एका उघड्या खड्यातील पाण्याच्या गाळात रुतलेला क्रिकेटचा चेंडू काढण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी ही हृदयद्रावक घटना घडली असून, संपूर्ण भोईवाडा परिसरावर शोककळा पसरली आहे.
शिफान साकेर खान (६ वर्षे) आणि अहाद अब्दुल शरीफ शहा (५ वर्षे) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. दोघेही भोईवाडा परिसरातील रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिफान आणि अहाद इतर मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना बॉल शेजारील एका खड्यात पडला. हा खड्डा दोन वर्षांपूर्वी घर बांधकामासाठी खोदण्यात आला होता, मात्र आजतागायत कोणतीही उभारणी न करता तो खुला व पाण्याने भरलेला तसाच राहिला होता.
चेंडू आणण्यासाठी शिफान खड्यात उतरला, परंतु गाळात अडकून तो बुडाला. ही गोष्ट लक्षात येताच अहाद त्याला वाचवण्यासाठी धावला, पण दुर्दैवाने तोही त्याच पाण्यात हरवला. काही वेळाने स्थानिकांना या घटनेची कल्पना झाली आणि तात्काळ पोलिस व अग्निशमन विभागाला कळवण्यात आले. दोघांचे मृतदेह शोधून काढण्यात आले, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आले असून, त्या ठिकाणी नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दोन्ही कुटुंबांच्या आक्रोशाने वातावरण हृदयद्रावक बनले होते.
दोन्ही चिमुकले गरीब कुटुंबातील
शिफानच्या वडिलांचे खासगी ट्रॅव्हल एजन्सीवर एजंट म्हणून काम असून, अहादच्या वडिलांचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे. अहाद हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. दोघेही गरीब कुटुंबांतील असून बालकांच्या मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या आक्रोशमुळे मन हेलावून गेले. या दुर्घटनेनंतर संतप्त नातेवाईक व स्थानिकांनी जागेच्या मालकाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली. खड्डा दोन वर्षांपासून तसाच उघडा असून, कुठलाही संरक्षक कुंपण किंवा सूचना फलक लावलेला नव्हता. ही निष्काळजीपणा दोन निष्पाप जीवांच्या मृत्यूचे कारण ठरल्याचा आरोप करत नातेवाईकांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात जागा मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.