छत्रपती संभाजीनगर – घरगुती वादातून पोस्टमन पतीने अंगणवाडी सेविका म्हणून सेवेत असलेल्या ५५ वर्षीय पत्नीचा कोयत्याने गळा चिरून खून केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील राहेगाव येथे शनिवारी रात्री घडली.

अनिता चांगदेव शेलार असे या घटनेतील मृत महिलेचे नाव आहे. तर चांगदेव रामराव शेलार (५९) असे आरोपी पतीचे नाव आहे. या दोघांना एक मुलगा आणि दोन मुली असून, उभयतांची तिन्ही अपत्ये हे विवाहित आहेत. घटनेच्यावेळी चांगदेव शेलार हा पंढरपूर येथून शनिवारी सायंकाळी आला होता.

चांगदेव शेलार व त्यांची पत्नी अनिता हे दोघे रात्री जेवण करून त्यांच्या खोलीत झोपले होते. तसेच दुसऱ्या खोलीत त्यांची सून मीना प्रवीण शेलार ही एकटी झोपलेली होती. रात्री १२ वाजेच्या सुमारास आवाज आल्याने मीना जागी झाली. तिने खोलीत जाऊन बघितले असता चांगदेव यांच्या हातात कोयता होता. तसेच अनिता या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या. त्यांच्या मानेवर कोयत्याचे वार आढळून आले. घटना घडल्यानंतर चांगदेव हा फरार झाला.

मिना यांनी लगेच नातेवाईक व बाजूच्या नागरिकांना ही माहिती दिली. चांगदेव याने घटना घडल्यानंतर स्वतःच्या शेतात जाऊन विहीरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सकाळी नागरीकांनी त्याचा शोध घेतला असता तो विहिरीत जिवंत आढळून आला.

अनिता यांचा मृतदेह त्यांचे धोंदलगाव येथील भाऊ वाल्मीक आवारे यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. उपजिल्हा रुग्णालयात दुपारी अनिता यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणात नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या प्रकरणी हवालदार किरण गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चांगदेव शेलार विरूद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चांगदेव शेलार यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.