औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवार, ७ सप्टेंबर रोजी औरंगाबादेत येत आहेत. त्यांच्या हस्ते शेंद्रा येथील दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) देशातील पहिल्या इंडस्ट्रिअल (ऑरिक) सिटीच्या एका टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. शिवाय महिला मेळाव्यासही पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत, अशी माहिती उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी दिली.

पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रातील इतरही काही मंत्री उपस्थित राहणार आहेत. दिल्ली-मुंबई कॉरिडॉरअंतर्गत शेंद्रा-बिडकीन या भागातील ऑरिक सिटीत सुमारे ३६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. ऑरिक सिटीच्या भव्य सभागृहाचे कामही पूर्ण झालेले आहे. इतरही कामांनी वेग घेतला आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासोबतच बचत गटाचा मेळावा घेण्यात येणार असून त्यातही पंतप्रधान मार्गदर्शन करणार असल्याचे राज्यमंत्री सावे यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर १५ सप्टेंबरच्या आसपास आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून तत्पूर्वीच त्यांचा दौरा आखून भाजपकडून एकप्रकारे प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी उचलण्यात आलेले पाऊल आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.