सुहास सरदेशमुख, औरंगाबाद
दहा वर्षांपूर्वी मोहन शेलार यांनी मालमोटार विकत घेतली तेव्हापासून ते कधीच रिकामे बसले नव्हते. गेल्या १९ दिवसांपासून त्यांची मालमोटार जागची हललेली नाही. ‘‘मंदी’चा असा फेरा मी माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही’, असे ते सांगतात. उद्योगांनी उत्पादनात ३० टक्क्य़ांपर्यंतची घट केल्याची आकडेवारी असली तरी मंदीचा परिणाम वाहन व्यवसायावर मोठय़ा प्रमाणात जाणवतो आहे. आता मोहन शेलारांना या महिन्यात घरमालकाला भाडे देता आले नाही. मुलींच्या शिक्षणाची फी महिनाभराने देऊ, असे शिक्षकांना सांगावे लागले. ते म्हणतात, ‘अशीच स्थिती राहिली तर जगणे मुश्किल होईल.’
४५ वर्षांपासून ट्रान्सपोर्ट कंपनी चालविणारे तसेच औरंगाबाद गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फैय्याज खान सांगत होते, ‘दररोज किमान ४५०० मोटारींची वाहतूक औरंगाबादहून देशाच्या अनेक शहरांकडे होत असते. गेल्या तीन-चार वर्षांपासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचा फटका सहन करतो आहोत. औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्य़ांतून कृषी माल आणि उद्योगांनी उत्पादित केलेला माल बाहेर जातो. विशेषत: औरंगाबाद आणि जालन्यातून मोसंबीच्या अडीचशेहून अधिक मालमोटारी आम्ही पाठवत असू. ती संख्या आता ५० वर आली आहे. डाळिंब उत्पादनही घटले आहे, कारण दुष्काळ.’ औरंगाबाद जिल्ह्य़ात मका, डाळिंब, कांदा अशा उत्पादनांची वाहतूक होत असते. तो व्यवसाय आता ५० टक्क्य़ांहून खाली आला आहे. एका मालमोटारीची उलाढाल झाली तर साधारणत: २० हजार रुपयांचे चलन फिरते राहते. ते सारे ठप्प आहे. परिणामी ज्यांनी कर्ज काढून मालमोटारी घेतल्या आहेत, त्यांचे अधिकच वाईट हाल आहेत. रामराव शेलारांनी १९९९ मध्ये मालमोटार विकत घेतली होती. गेल्या १९ दिवसांपासून ते रोज सकाळी वाळुज औद्योगिक वसाहतीच्या ट्रक टर्मिनलजवळ येतात, पण त्यांना काम काही मिळत नाही. शेलारसारखे अनेक वाहनचालक आणि मालक हैराण आहेत. कधी मंदीतून सुटका होईल, हे कोणालाच सांगता येत नाही. अन्य क्षेत्रांत मंदी आली तरी औरंगाबादहून बीअर आणि मद्य यांची वाहतूक तरी होत असे. सर्वसाधारणपणे या क्षेत्राला मंदीचा फटका बसत नाही. पण या वर्षी तोदेखील जाणवत आहे. शेलार औरंगाबादहून मुंबईला बीअर किंवा मद्यविक्रीच्या बाटल्या घेऊन जायचे आणि येताना बजाज कंपनीसाठी लागणारा पत्रा आणायचे. आता दोन्ही बाजूने कामच नाही. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. मुलांचे शिक्षण आणि घरखर्चसुद्धा कसा चालवावा, असा पेच त्यांच्यासमोर आहे.
जागची गाडी हललीच नाही तर त्याच्या दुरुस्तीचा प्रश्नच येत नाही. शुभम ऑटोमोबाईल्स या नावाचे दुकान ट्रक टर्मिनल्सच्या शेजारी आहे. त्याचे मालक सांगत होते, ‘आता गाडीचा पाटाच खराब होत नाही. त्यामुळे आमची विक्री थांबली आहे. दुरुस्तीसाठी गाडय़ा येत नाहीत, त्यामुळे मॅकेनिकच्या हाताला काम नाही.’ याच भागातील सुमीत ट्रान्सपोर्ट कंपनीमार्फत दररोज अडीचशे गाडय़ा देशाच्या वेगवेगळ्या भागात पाठविल्या जायच्या. आता २० सुद्धा गाडय़ा भरल्या जात नाहीत, असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. मंदीने चाक रूतन बसले आहे. त्यात शेलारांसारखा माणूस किती दिवस तग धरेल, या प्रश्नाचे उत्तर कदाचित अर्थमंत्र्यांकडे असेल, पण त्याची अंमलबजावणी होईपर्यंत फेऱ्यात अडकलेला माणूस अधिक गर्तेत जात आहे.