छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या बैठकीत नुकतीच चर्चा केली.

बिडकीन येथील औद्योगिक क्षेत्रात किर्लोस्कर, टोयाटो, यांनी इलेक्ट्रिकल वाहन निर्मितीसाठी कारखान्याचे काम सुरू केले आहे. या वाहन निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळांची गरज भासणार आहे. हे मनुष्यबळ आयटीआय व एमआयडीसी यांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या कौशल्य विकास केंद्रातून ते व्हावे असे अपेक्षित होते.

प्रशिक्षण घेणाऱ्या उमदेवारासाठी निवास व्यवस्था निर्माण करण्यासाठी शेंद्रा ऑरिक येथे भूखंड उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यास तत्वत: मान्यता देण्यात आली आहे.

येत्या काळात मनुष्य विकासावर भर देण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. शहरातील सिडको भागात औद्योगिक मंडळाकडे पाण्याची मागणी करण्यात आली आहे. भांडवली गुंतवणूक केल्यास ही जलवाहिनी बदलण्यास मंजुरी देण्यात आली. सामंत यांनी अतिवृष्टी बाधित गावांचीही पाहणी केली.