छत्रपती संभाजीनगर : उनाडकीत म्हणा, की भीतीने एका तरुणाने पाण्याजवळच्या खडकात दिसलेल्या सापाला दगड मारला. साप तीन तास जागचे हलूही शकला नाही, ते कणा मोडल्यामुळे. या सापाकडे अखेर काहींचे लक्ष गेले आणि ‘सर्प रेस्क्यू हेल्पलाइन’ला कळवण्यात आले. सर्पमित्रांनी सापाला वन्यजीवांवर अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज उपचार केंद्रात दाखल केले. तेथे डिजिटल क्ष-किरण, आयडीईएफसह रक्तचाचण्यांतून तपासणी केली. सापाला भुलीचे इंजेक्शन फारसे लागू होणार नाही म्हणून मुखपट्टी लावून गॅसद्वारे बेशुद्ध केले. त्याचा मणका तीन ठिकाणी तुटलेला होता. शस्त्रक्रिया आणि सेवाशुश्रूषा झाल्यानंतर सापाला नैसर्गिक अधिवासात सोडले गेले. अशा जखमी १४३ सापांना मागील सहा महिन्यांत जीवदान देऊन सोडून देण्यात आले. सर्पमित्र आणि वन्यजीवप्रेमींनी हा लेखाजोखा मांडला आहे.
सिडकोतील एन-४ मध्ये वन विभागाच्या समन्वयाने डाॅ. नीलेश जाधव व डाॅ. शीला जाधव यांच्या रुग्णालयात वन्यजीवप्रेमींकडून आणलेल्या वन्य प्राण्यांवर उपचार केले जातात. या सर्वोपचार केंद्रात क्ष-किरण, रक्तचाचणी, सोनोग्राफी, लेझर टेक्नाॅलाॅजी, एमआरआय, शस्त्रक्रियेची आधुनिक उपचार यंत्रणा आहे. येथे वन्य प्राण्यांवरील चाचण्यांचे शुल्क घेतले जात नसल्याची माहिती सर्पमित्र तथा मॅन विथ इंडीज फाउंडेशनचे संचालक तथा वन्यजीव बचाव तज्ज्ञ आशिष जोशी यांनी दिली.
या फाउंडेशनद्वारे ‘नो टच रेस्क्यू – एक वैज्ञानिक व सन्मानजनक पद्धत’ अभियान राबवले जाते. ही पद्धत सापांच्या नैसर्गिक वर्तनाचा आदर करते. जबरदस्तीचा वापर न करता पाइप व पिशवीसारखी साधी उपकरणे वापरून अधिवासात सोडले जाते. त्यामुळे आम्ही व वन विभाग सापाला चिमट्याने पकडू नये, असे आवाहन करतो, असे जोशी सांगतात.
त्याचे कारण जोशी यांनी सांगितले, की चिमट्याने पकडलेल्या सापाच्या मणक्याला गंभीर इजा होते. मणक्यातील मज्जापेशींचा मेंदूकडे संवेदना वाहून नेणारा संपर्क तुटला, तर त्याचे सर्वस्वच संपते. माणसांसारख्याच यंत्रसामग्रीने सापांसह वन्य प्राण्यांवर येथे उपचार केले जातात.
सहा महिन्यांत १४३ विषारी, बिनविषारी सापांना उपचारानंतर नैसर्गिक अधिवासात सोडले गेले. सहा महिन्यांत ५५ घुबड, चित्रबलाक, नीलगाय, मोर, चिमणीसह बिबट्या आदी अडीचशे प्राण्यांवर डाॅ. नीलेश जाधव, डाॅ. शीला जाधव, डाॅ. अमित परदेशींसह चमूच्या सहकार्याने उपचार केले आहेत. उपचार पूर्ण होईपर्यंत वन विभागाने दिलेल्या जागेत प्राण्यांना ठेवले जाते. – आशिष जोशी
मराठवाड्यातले एकमेव उपचार केंद्र
मराठवाड्यातील धाराशिव, बीड, जालन्यासह विदर्भातील बुलडाणा, खान्देशातील जळगाव व अहिल्यानगर येथूनही दररोज जखमी वन्यजीवांना येथे उपचारासाठी दाखल केले जाते. स्वतंत्र शस्त्रक्रियागृह आहे. रक्तदाब, ईसीजी, रक्त चाचण्या, अल्ट्रा साउंड, डिजिटल क्ष-किरण या यंत्रणांद्वारे तपासणी केली जाते. – डाॅ. शीला जाधव