छत्रपती संभाजीनगर : तत्कालीन महसूलमंत्री अब्दुल सत्तार आणि आमदार संजय शिरसाट यांनी राजकीय दबाव टाकून सहजापूर येथे वर्ग- २ श्रेणीतील गट क्र. ८ मध्ये १० एकर जमीन कमी किमतीमध्ये स्वत: मुलाच्या नावे खरेदी केली. असे करण्यासाठी आठ वेळा निलंबित तलाठ्याची या तलाठी ‘सजा’साठी नियुक्ती करायला लावली. तत्कालीन महिला तहसीलदारांनी या प्रकरणात स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यानंतर तहसीलदारही बदलण्यात आला. हा व्यवहार करताना अनेक घोळ घालण्यात आले. हे खरेदी प्रकरण तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या कार्यकाळात घडले असल्याचे सांगत शिरसाट यांनी अनेक भागांत जमीन खरेदीचा सपाटा सुरू ठेवला आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असून सर्व जमीन व्यवहारांची माहिती देण्यासाठी राज्यपालांची वेळ मागितली असल्याचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत सांगितले.
‘व्हिटस्’ प्रकरणातून माघार घेण्याचा निर्णय समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी घेतल्यानंतर त्यांनी शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये १२० कोटी रुपयांचा आसवनी प्रकल्प उभारणीसाठी भूखंड खरेदी करण्यापूर्वी आरक्षण उठविण्यासाठी बऱ्याच खटपटी करवून घेतल्याचा आरोप खासदार जलील यांनी केल्याने खळबळ उडाली होती. बुधवारी जलील यांच्या घरावर शिरसाट समर्थक शेण टाकतील, असा मजकूर समाज माध्यमांमधून पुढे आला. त्यानंतर इम्तियाज जलील यांच्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. पत्रकार बैठकीत दुपारी जमीन खरेदीमधील अनियमिततेची माहिती देणार असल्याचे कळाल्याने शेण टाकण्याची घोषणा करण्यात आली होती.
जलील यांनी शिरसाट यांच्या जमिनी व्यवहाराच्या विविध प्रकरणांची माहिती पत्रकार बैठकीत दिली. ते म्हणाले, ‘सहजापूर येथील वर्ग – २ ची १० एकर जागा खरेदीसाठी तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संगनमत करून त्यांच्या आदेशाने व्यवहार घडवून आणण्यात आले. १० एकर जमीन एक कोटी १० लाख रुपयांमध्ये घेण्यात आली. यासाठी आवश्यक असणारे शुल्कही लवकर भरले गेले नाही. खरेतर वर्ग दोनची जमीन अहस्तांतरणीय असताना परवानगीसाठी शासकीय यंत्रणांनी बऱ्याच कसरती केल्या. त्यामुळे ज्या जमिनीचे बाजारमूल्य आठ कोटी रुपये आहे ती जमीन कमी पैशांत शिरसाट यांनी आपल्या मुलांसाठी घेतली. प्रकरणात चौकशी झाली तर बरेच गैरव्यवहार उघडकीस येतील.
केवळ मुलगाच नाही तर शहरातील विविध ठिकाणी सिद्धांत, तुषार आणि पत्नी विजया यांच्या नावे शिरसाट यांनी जमिनी घेतल्या आहेत. यातील वर्ग दोनच्या जमिनी खरेदी-विक्रीत गैरप्रकार आहेत. अन्य जमिनी विक्री करणाऱ्यांच्या नावांसह शिरसाट यांनी जमविलेल्या संपत्तीचा तपशील जलील यांनी जाहीर केला. जालना रोडवरील जिल्हा न्यायालयासमोर चिंतामणीनगरमध्ये १२ हजार चौरस फुटाची जमीन आपली पत्नी व मुलाच्या नावे घेतली. याशिवाय सहजापूरमध्ये डिसेंबर २०२४ मध्ये एक कोटी ५० लाख रुपयांतून दोन एकर दोन गुंठे जमीन सिद्धांत यांच्या नावे घेण्यात आली. या गटातील एक जमीनही त्यांनी खरेदी केली आहे. यातील सहजापूर जमिनीमध्ये कसाबखेडा, तिसगाव आणि धरमपूर येथून मुरुम टाकला जात आहे. या सर्व व्यवहारासाठी मंत्री शिरसाट यांनी पैसे कोठून आणले, याची चौकशी करण्याची मागणी असल्याचे माजी खासदार जलील म्हणाले.
वर्ग – २ च्या जमिनी म्हणजे काय?
प्रार्थनास्थळांच्या खर्चासाठी सरकार अथवा राज्यव्यवस्थेने दिलेल्या जमिनीची श्रेणी वर्ग दोन म्हणून नोंदवली जाते. तसेच प्रत्येक गावात गायरान असते आणि दलित समाजाचे उत्थान व्हावे. त्यांना सामावून घेण्यासाठीही जमीन दिली जात असे. या जमिनीस वतन जमिनीही संबोधले जाते. या सर्व जमिनीला शासकीय भाषेत प्रतिबंधित सत्ता प्रकार असा शब्द वापरला जातो. ज्याची मालकी अहस्तांतरणीय असते. जर अशा जमिनीचे हस्तांतरण करायचे असल्यास त्यास वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते.