छत्रपती संभाजीनगर : ‘अण्णा’ म्हणजेच वाल्मीक कराड, असे गृहीत धरून संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांनाही अण्णाच म्हटले जात. त्यामुळे अण्णा शब्दावरून आरोपीपर्यंत जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न चुकीचा ठरवत या गुन्ह्यांमध्ये आपण सहभागी नव्हतोच, असा युक्तीवाद मंगळवारी वाल्मीक कराड यांच्या वकिलांनी न्यायालयात केला.

बीडच्या मकोका न्यायालयात आरोपी वाल्मीक कराड यांच्या वतीने सुनावणी दरम्यान करण्यात आलेला हा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी फेटाळून लावला. वाल्मीक कराड हाच या गुन्ह्यातील प्रमूख सूत्रधार असल्याचा दावा करण्यात आला. वाल्मीक कराडचे वकील मोहन यादव यांनी खंडणी, ॲट्रॉसिटी व हत्या हे तिन्ही गुन्हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्याचे तीन वेगवेगळे दोषारोपपत्र दाखल करणे गरजेचे आहे. पोलिसांना तीन वेगवेगळे गुन्हे एकत्रित करून दोषारोप करण्याचा अधिकार नाही, असाही युक्तिवाद करण्यात आला.

या प्रकरणातील सरपंच हत्या प्रकरणात दाखल मूळ गुन्ह्यात फिर्यादी हा शिवराज देशमुख आहे, त्याच्या जबाबात वाल्मिक कराडचे नाव नाही. १५ जानेवारीला त्याला हत्या प्रकरणी अण्णा म्हणजेच वाल्मीक कराड असे गृहीत धरून आरोपींची नावे ठरविण्यात आली. तसेच वाल्मीक कराड याला मकोका लावताना आवश्यक कायद्याची तरतुदीची पूर्तता होत नाही, असा दावाही कराड याच्या वकिलांनी केला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळून लावला. खंडणी ते हत्या प्रकरणाचा पडद्यामागचा सूत्रधार हा वाल्मीक कराडच होता. या साऱ्या प्रकरणी सुदर्शन घुले हा ‘गँग लीडर’ असला तरी दिग्दर्शक हा वाल्मीक कराड होता, असे सांगत आवादा कंपनीस मागितलेल्या खंडणीपासून सरपंच हत्येपर्यंत कराडच सूत्रधार असल्याचा दावा करण्यात आला. डिजिटल पुराव्यांवरही आक्षेप दाखल करण्यात आले.