परभणी पोलीस अधीक्षकांना नियुक्ती देण्याचे आदेश
औरंगाबाद : पोलीस दलात सेवेत असलेल्या वडिलांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या मुलीला नोकरीत सामावून घेण्याबाबतचा निर्णय दोन महिन्यात घ्यावा, असे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे (मॅट) उपाध्यक्ष न्या. बी. पी. पाटील यांनी परभणी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. सुनावणीदरम्यान, अर्जदार मागील १४ वर्षे अनुकंपाखाली नोकरी मिळेल, या प्रतीक्षेत असल्याचे न्यायाधिकरणाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते.
यासंदर्भात सबा फरहीन मोहम्मद सिराज यांनी अॅड. हनुमंत जाधव यांच्यामार्फत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात अर्ज केला होता. अर्जात म्हटल्यानुसार सिराज यांचे वडील मोहम्मद सिराज हे पोलीस दलात सेवेत असताना २००४ मध्ये मृत्यू पावले होते. अनुकंपा तत्त्वाखाली मुलीला नोकरी देण्यासाठी मृत सिराज यांच्या पत्नीने अर्ज केला होता. मात्र नोकरीसंदर्भातील यादीत सबा सिराज यांचा ज्येष्ठता क्रमांक बदलला. त्यामुळे मॅटमध्ये धाव घेण्यात आली. रिक्त जागा आणि त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश याकडे मॅट न्यायाधीशांचे लक्ष वेधण्यात आले.
अर्जदाराबाबत मागील १४ वषार्ंत निर्णय होऊ शकला नाही, ही बाबही न्यायाधिकरणाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यासंदर्भात शासनाच्या वतीने प्रतिवादींना निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, अशी विनंती करण्यात आली. न्यायालयाने अर्जदाराच्या अर्जावर दोन महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा व हा निर्णय अर्जदारांना लेखी तामील करावा, असे आदेश दिले.