छत्रपती संभाजीनगर : भाषा ही नेहमी भावना आणि बुद्धीतून वापरली जाते. नोंदी केल्यासारखी कादंबरी लिहावी, नाटक लिहावे असे नेहमी वाटते. आकृतिबंध बदलायला हवेत. भाषा कशी वापरली जाते? एक भावनेने आणि दुसरी बुद्धीने. राग, टिंगल करताना भावनेने वापरली जाते. भावनेतून एखाद्याची स्तुती करता येते. पण खोटी स्तुती करायची असेल तर बुद्धी वापरावी लागते. बुद्धी वापरून शास्त्र निर्माण झाली. भावनेने काही शोध लागलेत का, असा प्रश्न पडला आहे. पण भावनेने शोध लावले नाहीत, असे माझे कच्चे मत आहे. बुद्धीने अनेक शास्त्र निर्माण केली आहेत. साहित्य, वाङ्मय, हे केवळ भावनेतून नव्हतीच. महाभारतापासून हे आहे. तिथे भावनाही बुद्धीने समजून घ्यावी लागते. त्यामुळे कथात्म साहित्य हे ज्ञानशाखा आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ लिखित ‘श्याम मनोहर यांची नाटके’ या समीक्षात्मक ग्रंथाचे प्रकाशन रविवारी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी श्याम मनोहर बोलत होते. व्यासपीठावर मौजच्या संपादक मोनिका गजेंद्रगडकर, श्रीकांत भागवत, ज्येष्ठ समीक्षक व पुस्तकाचे लेखक सुधीर रसाळ यांची उपस्थिती होती.
‘विज्ञान, इतर कला यांनी रहस्य शोधले जे रहस्य आहे, येथे शोध सुरू होतो. आणि जिथे शोध सुरू होतो तिथे प्रतिभावंत होतात. पण त्यासाठी नवे शब्दही आणि आकृतिबंधही शोधावे लागतील. नाटक, जगणे, साहित्य यावर भाष्य करताना ते म्हणाले, विकसनशील आणि अविकसित राष्ट्रात शोध लागत नाहीत. ते विकसित राष्ट्रात लागतात. प्रतिभावंत तिकडे का असतात. आपल्यातील सभ्यता तिकडून का येतात? कारण आदर्श सभ्यता निर्माण करायची असेल तर प्रत्येक माणसाला शोध लावावा लागेल. जडवादात प्रतिभावंत अभ्यास पद्धती शोधत असतो. त्यासाठी आकृतिबंध बदलावे लागतील. भाषाही बदलावी लागेल. नवे शब्द शोधावे लागतील, असे सांगत ते म्हणाले, ‘एक नवीन नाटक लिहितोय आणि त्यातील पात्र आहे ‘आदर्श सभ्यता.’ तिला जन्म घ्यायचा आहे. पण ती केव्हा जन्माला येईल, तेव्हा प्रत्येकाला त्याचा शोध घ्यावा लागेल. ज्ञान म्हणजे काय? त्याचं शक्य असलेलं उत्तर-आहे ते रहस्य शोधायचे आहे. ते शोधण्याची पद्धत म्हणजे ज्ञान.’
या त्यांच्या नाटकाच्या शैलीबाबत चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, ‘मनोहरांचे नाटक म्हणजे मूळ मराठी ‘ब्लॅक कॉमेडी.’ ते आकृतिबंधच बदलून टाकतात. संवादाचेही आकृतिबंध बदलतात. एक वेगळीच उपरोधाची शैली आहे. कोणत्याही रंगआविष्काराचा बंध बघताना एक धागा त्यात आहे. ‘यकृत’, ‘ हृदय’, या नाटकांतून पुढे ‘कळ’ या कादंबरीतून तो दिसतो. वसंत कानेटकर, महेश एलकुंचवार यांसह बहुतांश नाटककारांनी नाटकाच्या सादरीकरणाचाही विचार केला आहे. पण मनोहर तो बंधही विचारात घेत नाहीत. त्यांना सत्यदेव दुबेंसारखा दिग्दर्शक मिळाला आणि त्यांनीही तो बंध बदलला.’
श्याम मनोहरांची पहिली कथा आल्यापासून त्यांनी निवडलेल्या वाङ्मय स्वरूपाबद्दल गोंधळ निर्माण झाला होता. मराठी समीक्षेच्या प्रांतात त्यांच्या लिहिण्याने आव्हान उभे केले. ते मराठी समीक्षकांनी पूर्ण केलं नाही. ‘दर्शन’ मध्ये काळ, स्थळ, अवकाश, प्रचलित आकृतिबंध उद्ध्वस्त केले. तरीही ते वाचकाला पछाडून टाकत होते. त्यांचे संवाद हे सूक्ष्म स्वरूपाचं नाट्य आहे. ते मानवी जीवनावर, वास्तवावर प्रकाश टाकतं. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पाहिल्यावर विविध आकार, न आवडणाऱ्या संवेदनाही दिसतात तशा त्यांच्या लिखाणातून दिसतात, असे मत ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मौज प्रकाशनचे श्रीकांत भागवत यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार संजीव कुळकर्णी यांनी केले.