छत्रपती संभाजीनगर : रेल्वेस्थानकावरील छत्रपती संभाजीनगरच्या फलकाच्या खाली अजाणतेपणी लघुशंका केल्यानंतर ज्या तरुणाचे चलचित्र समाजमाध्यमावर टाकण्यात आले. त्या तरुणाला नंतर धमक्यांचे दूरध्वनी सुरू झाले. त्याने समाज माध्यमांवर माफी मागितली. पण काही एक उपयोग होईना. तो धमक्या आणि बदनामीला एवढा वैतागला की शेवटी या तरुणाने विहिरीत उडी मारुन स्वत:ला संपवले.
या प्रकरणी जालना जिल्ह्यातील आष्टी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्या करताना विहिरीत उडी मारण्यापूर्वी या तरुणाने स्वत:च्या हाताला बांधून घेतले. महेशचे संजय आढे असे मृत २७ वर्षाच्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
आत्महत्या करण्यापूर्वी सकाळी सहा वाजता त्याला धमकीचा शेवटचा दूरध्वनी आला होता. परतूर तालुक्यातील ढोकमाळ तांडा येथील संजय आढे व त्याचा मित्र दत्ता चव्हाण हे दोघे जण छत्रपती संभाजीनगर येथे ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी आले होते. गावी परतण्यासाठी ते रेल्वेस्थानकावर गेले असता घाईची वेळ आल्याने त्याने छत्रपती संभाजीनगर असे लिहिलेल्या पिवळ्या फलकाजवळ त्याने लघुशंका केली. त्याची ही कृती कोणी तरी भ्रमणध्वनीच्या आधारे चित्रित करुन समाज माध्यमांवर टाकली. येथून महेश आडे यांचे आयुष्यच पालटून गेले. त्याला शिव्यांचे आणि जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या.
आपण केलेली चूक लक्षात आल्यानंतर त्याने समाजमाध्यमांवर माफीही मागितली. मात्र, धमक्यांचे फोन सुरूच होते. मृत्यूपूर्वीही त्यास धमकीचा फोन आला असल्याचे त्याचा भाऊ अखिलेश आढे याने पाेलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
वारंवार येणाऱ्या धमक्यामुळे तो वैतागला होता. सकाळी सहाच्या दरम्यान तो घरातून बाहेर पडला. विहिरीवर त्याने स्वत: च्या हाताला दोरीने बांधून घेतले आणि विहिरीत उतरुन स्वत: संपवून घेतले, अशी नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. काही तरुण मारण्याची धमकी देत असल्याने तो वैतागला होता. जगणेच मुश्किल केल्याचे सांगत त्याने आत्महत्या केल्याचे तक्रारी नमूद आहे.
धमक्या देणाऱ्या काही तरुणांची नावेही तक्रारी देण्यात आली आहेत. पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आष्टी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश सुरवसे म्हणाले, या तरुणांस ‘इन्स्टाग्राम’वरुन अधिक धमक्या येत होत्या. आता ज्यांनी त्या दिल्या त्यांचे जबाब घेणे सुरू आहे. समाजमाध्यमातून मिळालेल्या वागणुकीमुळे वैतागला असल्याचेच या तरुणाने आत्महत्या केल्याचे आतापर्यंतच्या तपासातून पुढे आले आहे.
