औरंगाबाद : औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पंडित दीनदयाळ कौशल विकास केंद्राच्या फलकाला सोमवारी दुपारी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काळे फासले. दिल्लीतील जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर रविवारी झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून आम्ही हे पाऊल उचलल्याचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहित जाधव यांनी माध्यमांना सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांची दडपशाही यापुढे चालणार नाही. विद्यापीठातील पंडित दीनदयाळ कौशल केंद्र हे संघ विचारांचे प्रतीक आहे. संघप्रणीत भाजपने जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहल्ला केला त्याचा युवक काँग्रेस निषेध करत आहे, असे या वेळी पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहित जाधव, कार्याध्यक्ष देव राजळे, विद्यापीठ अध्यक्ष योगेश बहादुरे, अजय भुजबळ आदींसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले. विद्यापीठात अचानक केलेल्या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली.