गार वातावरणात पदार्थ टिकतात
कोणतेही पदार्थ खराब होतात ते त्या पदार्थावरच्या किंवा हवेतल्या सूक्ष्म जिवांमुळे. हे सूक्ष्म जीव त्या पदार्थामधले जे घटक असतात त्यांचं स्वत:च्या वाढीसाठी वेगळ्या घटकांत रूपांतर करतात. यामुळेच तो पदार्थ खराब होतो. पण हे सूक्ष्म जीव जास्त कार्यरत असतात ते गरम वातावरणात. ते जितकं गार होईल, तितकं हे जीव काम करेनासे होतात. त्यामुळेच फ्रीजमध्ये हे पदार्थ जास्त टिकतात.

प्राणी, पक्षी आजारी पडतात?

प्रत्येक सजीव आजारी पडू शकतो. कुठल्याही प्राण्याचं शरीर म्हणजे एक प्रकारचं यंत्रच असतं. त्यात बिघाड होणं म्हणजे आजारी पडणं. त्यामुळे तापापासून पोट बिघडण्यापर्यंत तुम्हाला ज्या गोष्टी होतात त्या सगळ्या पशू-पक्ष्यांना होऊ शकतात. माणूस हुषार असल्यामुळे त्यानं बऱ्याच आजारांवर उपाय, औषधं तयार केली आहेत; पण बहुतेक प्राण्यांचे मेंदू इतके विकसित न झाल्यामुळे त्यांना या गोष्टी कळत नाहीत. त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो.

कुत्रा एकसारखा जीभ बाहेर काढतो

उन्हाळ्यात खूप उकडतं. त्यामुळे कुत्रा आपल्या शरीराचं तापमान कमी करण्यासाठी जीभ बाहेर काढतो. आपल्याला उकडतं तेव्हा शरीराला गार करण्यासाठी घाम येतो, तशी कुत्र्यांसाठी जीभेची ही खास रचना असते. जीभ बाहेर काढली की शरीरातलं तापमान बाष्पीभवनामुळे कमी होतं आणि शरीर थोडं थंड होतं. खूप ऊन असतं तेव्हा कुत्रा तोंड उघडं ठेवून बसलेला असतो.

डास का चावतात?

खरं तर सगळेच डास आपल्याला चावत नाहीत. डासांच्या माद्या चावतात. चावतात म्हणजे ते त्यांच्या सोंडेसारख्या अवयवानं आपलं रक्त शोषून घेतात. आपल्या रक्तातला प्रोटिन हा घटक असतो, तो त्या माद्यांना अंडी तयार करण्यासाठी आवश्यक असतो. त्यामुळे ते आपल्याला त्रास देतात म्हणजेच चावतात.

पाण्याची चव वेगवेगळी कशी?

खरं तर पाण्याला कोणतीच चव नसते. आपल्याला चव लागते ती त्यातल्या क्षारांची. जमिनीतल्या क्षारांमुळे हे पाणी गोड लागतं. घरात पाणी पूर्ण शुद्ध करून येतं, त्यामुळे त्यातले क्षार बऱ्याच अंशी कमी झालेले असतात, त्यामुळं त्या पाण्याला चवच लागत नाही. समुद्रातलं पाणी खारट लागतं, कारण त्यात सगळीकडून येणाऱ्या नद्यांच्या पाण्यातले क्षार मिसळलेले असतात. हे क्षार वर्षांनुवष्रे समुद्रात साठत जातात. समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन त्यातलं शुद्ध पाणी हवेत जातं; पण क्षार मात्र तिथंच राहतात. त्यामुळं ते पाणी खारट लागतं.

कांदा चिरताना डोळ्यांतून पाणी येतं

आपण कांदे चिरतो तेव्हा त्यातल्या पेशी म्हणजे त्यांचे अगदी छोटे भाग असतात त्यातून काही प्रकारची आम्लं बाहेर पडतात. त्यांची एक प्रकारची रासायनिक प्रक्रिया घडते आणि सल्फर नावाचा एक वायू बाहेर पडतो. हा वायू आणि आपल्या डोळ्यांतले पाणी एकत्र येतात आणि त्यांचं पुन्हा एक आम्ल तयार होतं. त्यामुळे डोळे चुरचुरल्यासारखे वाटतात. आपण कांदा नंतर भाजीत घालतो, तेव्हा उकळल्यामुळे, भाजल्यामुळे किंवा इतर गोष्टींमुळे हे सल्फरचं प्रमाण कमी होतं आणि तेव्हा डोळ्यातून पाणी येत नाही.