वृषाली गटणे
‘‘मला या खोक्यात बसून जाम कंटाळा आलाय! मस्त पंख पसरून उडावंसं वाटतंय…’’ मीर ड्रॅगन कुरकुरला.
‘‘ए मलापण… या कोपऱ्यात माझ्या अंगावरची लोकर कुचकुचायला लागलीये.’’ कन्ना बाहुली लगेच म्हणाली.
‘‘कित्ती दिवस झाले सृजाने आमचा किल्लाच बनवला नाही. सारखा मैदानात जाऊन फुटबॉलच खेळत असतो. आमच्या अंगावर धूळ चढायला लागलीये.’’ लाकडी ठोकळेही एकमेकांवर थर करत म्हणाले.
‘‘हल्ली तो आपल्याशी खेळतच नाही… का बरं असं करतो सृजा? आम्हाला तर कोडंच पडलंय!’’ जिगसॉ पझलचे तुकडे चिवचिवले.
ही सगळी खेळणी म्हणजे सृजाचे बालपणातले मित्रच! कन्ना बाहुली तर त्याची बेस्ट फ्रेंड होती. त्यांच्याकडे मदतनीस म्हणून येणाऱ्या फरीदा मावशीने स्वत: ही बाहुली विणली होती सृजाबाळासाठी!
पण आता… आता सृजा मोठा झाल्यापासून या मित्रांकडे लक्षच देत नव्हता. त्याला बाहेर, मोकळ्या हवेत खेळायला खूप आवडायचं. धावाधावी, चढाचढी, उड्या मारणं हेच त्याचे खेळ झाले होते. यावरच बोलायला आज मीर ड्रॅगनने सगळ्या खेळण्यांना एकत्र आणलं होतं. काय केलं की सृजा आपल्याशी परत खेळेल, यावर सगळ्यांनी उपाय सुचवायला सुरुवात केली.
‘‘आपण त्याच्यावर अटॅक करूयात!’’ दिवाळीची बंदूक म्हणाली.
‘‘नाही नाही, आपण त्याला एक छानसं पत्र लिहून आपलं म्हणणं सांगूयात.’’ चित्रकलेचे कागद आणि रंग म्हणाले.
‘‘ओय, त्याऐवजी भुंकून भुंकून त्याला बेजार केलं तर?’’ स्नोई कुत्रा म्हणाला!
‘‘ए सृजाला त्रास नाही हा द्यायचा…’’ कन्ना बाहुली म्हणाली, ‘‘काही झालं तरी तो आपला मित्र आहे नं!’’ हे म्हणणं मात्र सगळ्या खेळण्यांना पटलं.
कन्ना पुढे म्हणाली, ‘‘आपण असं करूयात, सृजा सारखा बाहेर खेळायला जातो नं… आपणही बाहेरच जाऊया. म्हणजे आपल्यालाही मस्त खेळायला मिळेल!’’
‘‘आयडिया एकदम भन्नाट!’’ सगळे म्हणाले. ‘‘चला चला… शोधूया सृजाला!’’
मग काय! काही खेळणी दुडुदुडु धावायला, काही उडायला, तर काही सरपटायला लागली. सगळ्यांना सृजापर्यंत पोहोचायची घाई झाली होती. एकमेकांना मदत करत सगळे दारापर्यंत पोहोचले आणि तेव्हाच त्यांना दाराबाहेर सृजाची चाहूल लागली. दरवाजा खाडकन् उघडला गेला.
‘‘वाचवा… वाचवा…’’ सृजाने आरोळी ठोकली. ‘‘मला घरात घ्या. बाहेर एक मोठ्ठा राक्षस आहे!’’
‘‘राक्षस? कुठे आहे राक्षस?’’ सगळी खेळणी सरसावली!
‘‘आई आई गं…’’ तेवढ्यात मीर ड्रॅगनच्या टोकदार शेपटीवर सृजाचा पाय पडला.
‘‘काय रे सृजा!’’ कन्ना बाहुली काळजीने पुढे होत म्हणाली.
‘‘अगं, साळुंकेआजोबा राक्षस होऊन माझ्या मागे लागलेत. म्हणून धावत घरात आलो. पण हा मीर बघ ना… इथे शेपूट पसरून पडलाय! किती जोरात टोचलं मला…’’ चिडून सृजा म्हणाला.
खरं तर फुटबॉल शोधण्यासाठी सृजानेच त्याचा खेळण्यांचा अख्खा खोका रिकामा केला होता. आणि फुटबॉल सापडल्यावर सगळी खेळणी तशीच जमिनीवर सोडून तो खेळायला पळाला होता, त्यामुळे तो मीरला असं म्हणाल्यावर सगळी खेळणी टकामका त्याच्याकडे पाहायला लागली.
स्नोई हळूच म्हणाला, ‘‘अरे, फुटबॉल शोधण्यासाठी तूच आम्हाला बाहेर काढलंस ना… आणि इथेच विसरलास…’’
‘‘आम्हाला इथे पडलेलं पाहून आजी किती रागावली माहितीये…! ती आईला सांगत होती की, आम्हाला सगळ्यांना एका खोक्यात बंद करून माळ्यावर ठेवून द्यायचं!’’ ठोकळ्यांनी बातमी पुरवली.
सगळ्या खेळण्यांचे हिरमुसलेले चेहरे पाहून सृजाला वाईट वाटलं. त्याने खाली बसून सगळ्यांना जवळ घेतलं आणि तो त्यांचे लाड करू लागला. खेळण्यांचे चेहरे परत हसरे झाले. तेवढ्यात दार वाजलं. सृजाने जीभ चावली. ‘‘अरेच्चा! साळुंकेआजोबा बाहेरच राहिले!’’
‘‘अरे बदमाश, मला सोडून पुढे धावलास होय!’’ आजोबा आत येत म्हणाले.
‘‘नाही हो आजोबा… अशीच थोडीशी गंमत! चला, मीटिंगला सुरुवात करू या!’’
‘‘अरे व्वा! सगळे आधीच जमलेत इथे!’’ आजोबा हसत म्हणाले.
सगळ्यांच्या मनात आलेला प्रश्न मीरने विचारला, ‘‘कसली मीटिंग रे सृजा?’’
‘‘अरे, तुम्ही सगळे म्हणता ना की घरात नुस्तं बसून तुम्हाला कंटाळा येतो. म्हणजे मला काय तुम्ही डायरेक्ट सांगितलं नाहीये, पण मलापण कळतं बरं का! आणि म्हणूनच मी आणि साळुंकेआजोबांनी एक भन्नाट आयडिया शोधून काढली आहे.’’
आता सगळ्यांचे कान उभे राहिले. स्नोई म्हणाला, ‘‘कसली आयडिया? भू भू!’’
सृजा सांगायला लागला, ‘‘आपण सगळ्यांनी मिळून एक अशी जागा सुरू करायची जिथे तुम्ही खेळणी आणि आम्ही लहान मुलं एकत्र येऊ आणि एकमेकांशी खेळू! आणि कॉलनीतल्या सगळ्या मुलांनी त्यांच्या घरची चांगली, वापरता येतील अशी खेळणी या ठिकाणी ठेवायची.’’
‘‘म्हणजे असं बघा खेळण्यांनो, माझ्या नाती आहेत ना पीनू आणि झंपी, त्यांना हे रंगीत ठोकळे खूप आवडतात. हे वापरून काय काय बनवतात त्या… मग समजा असे खूप ठोकळे एकत्र ठेवले तर किती मजा येईल!’’ आजोबा म्हणाले.
‘‘म्हणजे शेअरिंग होईल आणि जास्त मजा येईल!’’ सृजाने अजून माहिती पुरवली
‘‘आवडली ना तुम्हाला आयडिया?’’
‘‘आयडिया एकदम भन्नाट!’’ सगळे एकदम म्हणाले.
मग पुढचे काही दिवस सगळ्यांचीच खूप लगबग झाली. सृजाच्या सगळ्या खेळण्यांनी एकमेकांची मदत करून आणि सृजाची थोडी मदत घेऊन स्वत:ला स्वच्छ करून घेतलं. थोडी थोडी डागडुजी करून घेतली.
सृजा, त्याचे कॉलनीतले मित्र-मैत्रिणी आणि साळुंकेआजोबा यांनी मिळून अशी वापरात नसलेली, पण चांगली टिकलेली, अजून खेळणी, खडू आणि रंगीत कागद जमा केली. एका दादाने तर त्याच्या घरी असलेली त्याच्या लहानपणची गोष्टी-कवितांची पुस्तकं आणून दिली. कॉलनीच्या हॉलमधलं एक कपाट या रंगीबेरंगी वस्तूंनी भरून गेलं.
या खेळ कट्ट्याचं उद्घाटन झालं. त्यासाठी स्पेशल पाहुणे म्हणून सृजाने शेजारच्या मिनुदीदीच्या दोन वर्षांच्या गोलुला आणि रेहानाला बोलावलं. सगळ्यांना आजीने केलेले दाण्याचे लाडू खाऊ म्हणून दिले. साळुंकेआजोबांनी केलेल्या छोट्याशा भाषणात मुलांना एकच अट घातली – ती म्हणजे सगळी खेळणी, पुस्तकं प्रेमाने वापरायची. जशी आपल्याला मिळाली तशी पुढच्या मित्रांसाठी ठेवायची. सगळ्यांनी जोरात होऽऽऽ म्हटलं आणि तो छोटासा हॉल दणाणून गेला! छान मांडून ठेवलेल्या खेळण्यांना तर फार भारी वाटत होतं. आपल्यावर प्रेम करणारी इतकी मुलं पाहून आणि आता रोज खेळायला मिळणार म्हणून सगळी खेळणी एकदम खूश झाली होती!