अदिती देवधर
‘‘हे औषधी असतं.’’ नदीपात्रातल्या पाणथळ जागेत उगवलेल्या पाणकणसाकडे बघत गणेश म्हणाला.
गणेश आणि त्यांची गॅंग दोन दिवसांसाठी आले होते. यश, यतीन गणेशच्या गावी जाऊन आले. यश, यतीन, संपदा आणि नेहा यांची गणेश, त्याचा भाऊ शैलेश, संगीता, मीना आणि राजूशी छान गट्टी जमली होती. तेव्हापासून शाळेला सुट्टी असली की ते इकडे किंवा हे तिकडे असं चालू होतं.
आज यश आणि संपदाच्या सोसायटीतले लोक नैसर्गिक वारसा फेरीला आले होते. अनेकजण पहिल्यांदाच नदीच्या जवळ आले होते. रांजणखळगे बघत, पक्षी निरीक्षण करत, नदीचा इतिहास ऐकण्यात सगळे गुंगून गेले.
‘‘केवढी माहिती आहे तुम्हाला- गणेश तुला वनस्पतींची आणि मीरा तुला पक्ष्यांची.’’ नेहा म्हणाली. फेरी झाली, काही लोक गेले, काही रेंगाळत होते. नदीपात्रातल्या सुंदर बसॉल्टवर आता गॅंग बसली होती.
‘‘आपणही अशीच फेरी गावात सुरू करायची का?’’ शैलेश म्हणाला.
‘‘मस्तच. तुमच्याकडे तर किती गोष्टी आहेत दाखवायला. ओढय़ाच्या काठावर आपण गेलो होतो तेव्हा किती पक्षी आणि फुलपाखरं दिसली.’’ यश म्हणाला.
‘‘करवंदं केवढी खाल्ली आपण. करवंदाची जाळी असते हे मला माहीतच नव्हतं.’’ नेहा म्हणाली.
‘‘हो, खरंच सुरू करा फेरी.’’ यतीन आणि संपदानं दुजोरा दिला.
‘‘गावाजवळ किल्लाही आहे. लोक येतात, पण नुसती पाटी लावलेली आहे तिथे, माहिती काही नाही.’’ राजू म्हणाला.
‘‘हा बसॉल्ट खडक बघून त्या किल्ल्याच्या भिंती आठवल्या. स्थानिक संसाधनं वापरली पाहिजेत असं सगळे म्हणतात हल्ली. त्या काळात दळणवळण मर्यादित होतं, त्यामुळे आपोआपच जवळ उपलब्ध असलेल्या गोष्टी वापरल्या जायच्या. किल्ल्याचा इतिहास सांगताना बसॉल्टचा इतिहास सांगता येईल.’’ संगीता म्हणाली.
‘‘सहा कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेला खडक आहे हे माहीतच नव्हतं.’’ मीना म्हणाली.
‘‘स्वयंपाकघरातल्या ओटय़ाचा ग्रॅनाइटसुद्धा ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झाला आहे. तेवढाच प्राचीन आहे.’’ यश म्हणाला.
‘‘आपण अंघोळीला वापरतो तो, अंग घासायचा दगड, प्यूमिस स्टोन, तोसुद्धा वाहणाऱ्या ज्वालामुखीच्या वर आलेल्या फेसातून तयार झाला आहे. हलका असतो, पाण्यावर तरंगतो तो.’’ यतीननं माहिती पुरवली.
‘‘अच्छा, ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेले म्हणून अग्निजन्य, आगीपासून जन्माला आलेले.’’ मीना म्हणाली.
‘‘शाळेत खडकांचे प्रकार शिकतो तेव्हा अग्निजन्य खडक वगैरे काही केल्या पाठ होत नाही. हे किती सहज लक्षात राहिलं.’’ काळाशार बसॉल्टवर हात फिरवत गणेश म्हणाला.
‘‘वारसा फेरी कशी सुरू करायची ते आम्हाला सांगा ना.’’ मीरा यश आणि संपदाला म्हणाली.
‘‘छानसं नाव शोधूयात, एकदम हटके आणि मग संहिता. आम्ही मदत करतोच.’’ संपदा म्हणाली.
‘‘अहं, असं नाही. तुला एवढे पक्षी आणि गणेशला एवढय़ा वनस्पती कशा माहीत हे गुपित आम्हाला आधी सांगितलं पाहिजे, तरच.’’ यश नाटकीपणे हसत म्हणाला.
गणेशचा फोन वाजला. ‘‘ठीक तर. आमचं गुपित सांगतो.’’ फोनकडे बघत डोळे मिचकावत गणेश म्हणाला.
काय गुपित आहे ते, त्यांची वारसा फेरी सुरू झाली का, हे सगळं कळायला आता दोन आठवडे थांबावे लागेल.
aditideodhar2017@gmail.com