दादूच्या डोळ्यांना लागलेल्या पाण्याच्या धारा काही केल्या थांबत नव्हत्या. नाक-डोळे शर्टाच्या बाहीने पुसून पुसून दोन्ही बाह्या ओल्याचिंब झाल्या होत्या. दादू आपल्या भावनांना काही केल्या आवर घालू शकत नव्हता. कारणही तसंच होतं. दादूचा या शहरातील आजचा शेवटचा दिवस होता. हे शहर म्हणजेच पर्यायाने ही माणसं, ही शाळा, हे मित्रमत्रिणी कदाचित त्याला आयुष्यात परत कधीही भेटणार नव्हते. त्यामुळे तोच का, त्याचे सारे दोस्तही तेवढेच व्याकूळ झाले होते.
याच वर्षी, म्हणजे आठवीत दादू या शाळेत आला होता. तोही योगायोगाने म्हणजे दुर्दैवी योगायोगाने. दादूच्या गावात प्रचंड दुष्काळ पडला होता. सर्वाना दुष्काळाचे चटके असह्य झाले होते. त्यातच दादूच्या घरात खाणारी दहा तोंडं आणि वडील शेतकरी; त्यामुळे दोन वेळच्या जेवणाचीच का पाण्याचीही भ्रांत पडावी अशी परिस्थिती. आणि दादूला तर शिकण्याची प्रचंड इच्छा. याच इच्छेने त्याला शहराची वाट दाखवली. त्याचा खूप दूरचा काका शहरात राहायचा; तोही चाळीतल्या छोटय़ाशा खोलीत. पण दादूची दुर्दम्य इच्छा ओळखून तो दादूला काही काळासाठी स्वत:बरोबर शहरात घेऊन आला आणि घराजवळच्या शाळेत त्याला दाखल केलं. दादू खूप आनंदी झाला. एवढी मोठ्ठी शाळा त्याने आयुष्यात प्रथमच पाहिली होती. दुसऱ्या दिवशी तो शाळेत हजर झाला. जुना गणवेश, कापडी दप्तर, चेहऱ्यावर घाबरलेले भाव, हालचालीमधील कृत्रिमता ही दादूची त्या दिवशीची वैशिष्टय़ं. वर्गातली सारी मुलं दादूकडे पुन्हा पुन्हा पाहू लागली. जणू काही असा कोणी प्राणी ते पहिल्यांदाच पाहत असावेत. एवढय़ात कोण तरी खुसफसलं ‘नया है वह।’ आणि सर्वानाच ते म्हणावंसं वाटू लागलं. ते दादूकडे पाहत म्हणत होते- ‘नया है वह।’ दादूच्या शेजारी बसलेल्या राजीवने त्याला नाव विचारलं. ‘दादू गणू डांगमोडे.’ दादूचं हे नाव ऐकताच वर्गात हास्याचा लोट उसळला आणि जो-तो म्हणू लागला, ‘नया है वह, फिर भी नया है वह।’ पहिल्यांदा दादू घाबरला. त्याला पळून जावंसं वाटू लागलं. पण त्याने लगेचच विचार केला, आपण तर इथे आलोय शिकण्यासाठी. ते व्यवस्थित होणं आवश्यक असेल तर या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्षच करावं लागेल. असं मनात म्हणत दु:खाचा आवंढा गिळून टाकत दादूने ते ‘नया है वह’ याचा राग किंवा दु:ख येऊच दिलं नाही. दादूचं नाव, बोलण्याचा ढंग, एकंदर राहणीमान, वागण्याची पद्धत यामुळे मुलांना पुन्हा पुन्हा ‘नया है वह’ म्हणायला मिळत होतं.
..पण पंधरा ऑगस्टला दादूने आपल्या सुंदर पहाडी आवाजात देशभक्तिपर गीत सादर केलं आणि सगळी शाळा त्याला ओळखू लागली. ‘नया है वह, पर उसमें कुछ अलगसा भी है।’ हे सगळ्यांना कळून चुकलं. मग दादूला हळूहळू वर्गात दोस्त मिळू लागले. कधी कधी वर्गात फळ्यावर काही लिहिण्याचं काम मिळू लागलं. वर्ग त्याला आपल्या गटात सामील करून घेऊ लागला. पण ‘नया है वह फिर भी नया है वह’ म्हणायची सवय काही बदलली नाही. बघता बघता वर्षभरात दादूने अनेक ठिकाणी आपला छोटा-मोठा ठसा उमटवला होता. संगीत, खेळ, नाटक, चित्रकला, रांगोळी, गणित यांत काही ना काही वेगळं करून दाखवलं होतं. त्यातच शाळेच्या कंपाऊंडला लागून उगवलेलं एक रोपटं मायेनं जगवून त्याला फुलं आल्यावर वर्गातल्या सगळ्यांसोबत त्याने तो आनंद साजरा केला होता.
असा हा दादू, आज गावातल्या दुष्काळाची तीव्रता कमी झाल्याने पुन्हा गावाला परत चालला होता. म्हणून सारा वर्ग त्याला निरोप देण्यासाठी स्वत:हून एकत्र आला होता. जोरजोरात हुंदके देत रडणारा सारा वर्ग आणि दादू यांना पाहताच राजीव डोळे पुसतच ओरडला ‘ए, नया है वह, फिर भी नया है वह;’ यावर दादू रडता रडताही खुदकन हसला आणि म्हणाला, ‘मित्रांनो आम्हाला शहरातली धावपळ, इथली वागण्याची तऱ्हा खूप नवीन असते, ते जमतच नाही. मग वाटत राहतं, की आपल्यात काही कमी आहे का? ते कसं दूर करावं, लक्षातच येत नाही म्हणूनच आम्ही आणखी बावरतो. पण मी एक गंमत सांगू का? मी असा विचार केला, मला ही शहरातली वागण्याची रीत नसेल येत, पण तुम्हाला तरी कुठे गुरं राखता येतायत? पाणी शेंदता येतंय? शाळेसाठी मलोन् मल वाट तुडवता येतेय? कोरडी भाकरी खाता येतेय? जंगलात फिरता येतंय? हे जेव्हा मला समजलं ना तेव्हा माझी कमीपणाची भावना कुठल्या कुठं पळाली दोस्तांनो.’
सगळ्यांनाच हे पटून त्यांनी जोरजोरात माना हलवल्या आणि क्षमा म्हणाली, ‘म्हणूनच आज तू आमच्यातला एक बनलायस.’
‘हे घे दादू, आमच्या सगळ्यांच्या वतीने,’ त्याच्या हातात एक मोठ्ठा बॉक्स देत नील म्हणाला.
दादूने ते गिफ्ट नाकारताच मंदार सवयीने ओरडला, ‘दे रे, दे रे त्याला, नाही तर तसा घेणार नाही तो. क्यूं की नया है वह.’ सगळा वर्ग आपले भिजलेले डोळे घेऊनच हसत सुटला होता, अगदी दादूसकट..