छायाचित्र क्र. १ मध्ये पांढऱ्याशुभ्र पडद्यावर तीन प्राथमिक रंगांचे गोल दिसत आहेत – लाल, हिरवा, निळा (Red, Green, Blue, : Primary colours.)
छायाचित्र क्र. २, ३ व ४ मध्ये या प्राथमिक रंगांचे मिश्रण कसे होते ते पाहा.
लाल + हिरवा = पिवळा (Yellow)
हिरवा + निळा = मोरपिशी (Cyan)
निळा + लाल = किरमिजी/अमसुली (Magenta)
पिवळा, मोरपिशी व किरमिजी या रंगांना दुय्यम रंग (Secondary Colours) असे म्हणतात. कारण ते प्राथमिक रंगांच्या मिश्रणाने बनतात.
छायाचित्र क्र. ५ मध्ये मध्यभागी तीनही प्राथमिक रंगांच्या मिश्रणाने पांढरा प्रकाश तयार झाला आहे. कारण पांढरा प्रकाश हा मूलत: ३ प्राथमिक रंगांपासून (R.G.B.) बनवता येतो.
सर आयझॅक न्यूटन यांनी सूर्यप्रकाशाचे काचेच्या प्रिझममधून पृथ:करण केले तेव्हा त्यांना पांढऱ्या पडद्यावर ७ रंगांचा पट्टा मिळाला (ता,ना,पि,हि,नि,पा,जा किंवा V I B G Y O R ) पण प्रत्यक्षात या पट्टय़ांमध्ये म्हणजे वर्णपटात असंख्य रंगांच्या छटा असतात. केवळ ढोबळ मानाने व सोयीसाठी आपण त्यांना सात रंगांत विभागून टाकले आहे. मधल्या असंख्य छटा पाहायला खूप मजा येते. प्रत्यक्ष प्रयोग करून पाहा.
छायाचित्र क्र. ५ चे नीट निरीक्षण करून विचार करा की निळा आणि पिवळा प्रकाश मिसळला तर काय होईल? उत्तर आहे- पांढरा प्रकाश तयार होईल. तसेच लाल + मोरपिशी आणि हिरवा + किरमिजी यांचे उत्तरही पांढरा प्रकाश हेच आहे. म्हणून या रंगांच्या जोडय़ांना परस्पर-पूरक रंग (Complimentary colour) असे म्हणतात.
रंगीत सावल्या
पांढरा प्रकाश अपारदर्शक वस्तूने अडवला तर काळी सावली पडते, पण छायाचित्र क्र. ६ मध्ये बोटांची सावली मोरपिशी, ७ मध्ये किरमिजी व ८ मध्ये पिवळी दिसत आहे. कारण अनुक्रमे लाल, हिरवा व निळा दिवा झाकून ठेवला आहे. परस्पर-पूरक रंगांचा अर्थ आता जास्त स्पष्ट होतो. उदा. पांढऱ्या प्रकाशातून लाल रंग काढून टाकला तर मोरपिशी शिल्लक राहील.
हे उपकरण कसे तयार केले आहे ते थोडक्यात सांगतो. छायाचित्र क्र.९ पाहा. ३ पुठय़ांची नळकांडी घेऊन त्यात प्रत्येकी एक बहिर्गोल भिंग बसवलेले आहे. त्या प्रत्येक भिंगाच्या नाभी बिंदूवर (Focus) एक प्रखर प्रकाश देणारा रंगीत दिवा (R/G/B) बसवला आहे. हे दिवे म्हणजे Light Emitting Diodes (LED) आहेत. त्यांना ऊर्जा पुरवण्यासाठी ६ व्होल्टची रीचार्जेबल बॅटरी वापरली आहे. प्रत्येक LED च्या सीरिजमध्ये एक विद्युत रोध (Fixed Value Resistance) व एक कमी जास्त करता येणारा विद्युत रोध (Variable Resistance) बसवला आहे. त्यामुळे या रंगांची तीव्रतासुद्धा कमी-जास्त करता येते. विशिष्ट प्रमाणात तीन प्राथमिक रंग मिसळले तर स्वच्छ पांढराशुभ्र प्रकाश मिळतो. रंगद्रव्यांचे मिश्रण पुढील भागात वाचा.
(पूर्वार्ध)
संग्रहित लेख, दिनांक 20th Oct 2013 रोजी प्रकाशित
दिमाग की बत्ती.. : रंगांचे मिश्रण
रंगांच्या विविध छटांमुळे आपले जीवन आनंददायी झाले आहे. प्रकाशाच्या रंगांचे मिश्रण हे बेरीज पद्धतीचे मिश्रण (Additive Mixing) असते, तर रंगद्रव्यांचे मिश्रण हे वजाबाकी पद्धतीचे मिश्रण (Subtractive Mixing) असते.

First published on: 20-10-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mixed colours