मज आठवते पुन्हा पुन्हा ती शाळा
तो खडू, ते डस्टर आणि काळा फळा
त्या मित्र-मैत्रिणी, गप्पा त्या आठवती
ते रुसवेफुगवे आणिक मधली सुट्टी
त्या मधल्या सुट्टीमधला आठवे डब्बा
किती चवीचवीने मारत होतो गप्पा
हा कोण करोना येऊन बसला मेला
शाळेचा सगळा मोद घेऊनी गेला
आता झाली आहे शाळा ऑनलाइन
घरबसल्या बसल्या शाळा करतो जॉइन
अन् हजारदा ती जाते सारी रेंज
बाईंचा आमच्या आवाज होतो चेंज
धड दिसता काही होते गायब चित्र
ते आवाज येती किती चित्रविचित्र
जरी ऐसी शाळा सुटे दोन तासांत
परी आम्हा पारखा तो गुरूंचा हात
ही जावो लवकर करोनाची स्वारी
अन् सुरू होऊ दे शाळा किलबिलणारी
— पद्माकर भावे