डिसेंबर महिन्याच्या रात्री या मृगाच्या रात्री आहेत. मृग नक्षत्र पर्जन्याची चाहूल देतं म्हणून ते जीवनदायी आहे आणि ओळखायला सोपं व सुंदर म्हणून आनंदायीसुद्धा! कस्तुरीमृगाचं रहस्य त्याच्या नाभीत तसं या आकाशस्थ मृगाचं म्हणजे हरणाचं रहस्यही त्याच्या छोटय़ा आणि काहीशा दुमडलेल्या शेपटात आहे.
मृगाच्या बाणांच्या ताऱ्यांच्या, उत्तर-दक्षिण रेषेत, पण या ताऱ्यांच्या दक्षिणेस तीन अंधुक तारे लुकलुकताना दिसतात. त्यातील मधल्या ताऱ्यापाशी एक सुंदर तेजोमेघ आहे. विशेष म्हणजे हा तेजोमेघ तारकांना जन्म देणारा आहे. या तारकांच्या रेसिपीला भारंभार साहित्य लागत नाही. हायड्रोजन हा तारका बनविण्याचा एकमेव कच्चा माल आणि तो या तेजोमेघाकडे खच्चून भरलेला आहे. खच्चून शब्दांनी गरसमज करून घेऊ नका. या तेजोमेघातील हायड्रोजन खूप विरळ आहे. इतका की तेथील वायूची विरलता आपल्या समुद्रसपाटीला हवा जितकी विरल असते त्याच्या कित्येक लक्ष पटींने कमी आहे. परंतु हा वायू सुमारे ३० ते ३५ प्रकाशवर्षांचे क्षेत्र व्यापून आहे. त्यामुळे विरल असला तरी एकूण साठा भरपूर आहे. शास्त्रज्ञ सांगतात की, आपल्या सूर्यासारखे १० हजार तारे या ‘स्टॉक’मधून जन्म घेऊ शकतात.
हा तेजोमेघ बघण्याची इच्छा तुम्हाला आता नक्कीच झाली असेल. हा तेजोमेघ सहज दिसण्यासारखा आणि अतीव सुंदर आहे. तो तुमची निराशा करणार नाही. तुमच्याकडे दुर्बीण (telescope) नसली तरी चालेल, पण द्विनेत्री म्हणजे Binocular मात्र आवश्यक आहे.
मृगाच्या शेपटीतल्या मधल्या ताऱ्याच्या दिशेने तुम्ही तुमचा बायनॉक्युलर रोखलात की तुम्हाला या तेजोमेघाचे दर्शन झालेच म्हणून समजा. सरकीला (कापसाची बी) कापूस चिकटावा किंवा हवेत उडणारी पांढऱ्या रंगाची म्हातारी दिसावी तसे हे दृश्य दिसते.
डिसेंबर महिन्यात तर आवशीपासून (संध्याकाळपासून) पहाटेपर्यंत अख्ख्या मृगनक्षत्राचे दर्शन होते मग त्यातल्या तेजोमेघाचे का नाही होणार !
गॅलिलिओसारख्या ख्यातकीर्त निरीक्षकाच्या नजरेतून सुटलेल्या या तेजोमेघाचे प्रथम दर्शन १६११ मध्ये निकोलस पेरेक या फ्रेंच माणसाने घेतले. पुढे १६५६ मध्ये ख्रिश्चन ह्युजेन्सने याचे चित्र प्रसिद्ध केले. युरेनस ग्रहाचा संशोधक म्हणून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. खगोलीय वस्तूंचे छायाचित्रण करण्याचे तंत्र १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात विकसित झाले. हेन्री ड्रेपर ने १८८०-८१ च्या सुमारास या तेजोमेघाचा पहिला यशस्वी फोटो घेतला. ११ इंची िभगाची दुर्बीण वापरून सतत ५१ मिनिटे तेजोमेघाकडून येणारा प्रकाश फोटोच्या फिल्मवर घेतला तेव्हा कुठे या तेजोमेघाने आपली छबी उमटविली. दुर्बणिीच्या शोधापूर्वी अशा तेजोमेघांना लपलेल्या तारकांचे गुच्छ असे मानले जायचे, पण आता मृगातील तेजोमेघासारखे बरेच तेजोमेघ म्हणजे तारकांची जन्मस्थाने आहेत ह्याची शास्त्रज्ञांना खात्री पटली आहे.
हा तेजोमेघ तुम्ही पाहाल तेव्हा काळाच्या दृष्टीने तुम्ही १६०० ते १८०० वष्रे मागे म्हणजे भूतकाळात गेलेले असाल, कारण आज तुमच्या डोळ्यात शिरणारा हा प्रकाश तितक्या वर्षांपूर्वी तेथून निघाला आहे.
आपल्या सूर्यमालिकेचा विस्तार नेपच्यूनपर्यंत म्हणजे साधारण ४५० कोटी किलोमीटरचा आहे. या तेजोमेघाचा खरा विस्तार यापेक्षा २० हजार पट आहे म्हणूनच अनेक सूर्याना जन्म देण्याचा मान त्याला मिळाला आहे.
(समाप्त)