मनू, वय वर्ष सोडेतीन. एक अतिशय गोड आणि लाघवी मुलगी. आई-बाबा, आजी-तातू (आजोबा), शाळेच्या बाई सगळय़ांची आवडती. फक्त एका बाबतीत मात्र तिच्यापुढे सगळय़ांनी हात टेकले होते. ती गोष्ट म्हणजे, चूक झाल्यावर ‘सॉरी’ म्हणणं म्हणजे स्वत:चा अपमान झाल्यासारखं तिला वाटे. घरातल्या सर्वानी असहकार पुकारल्यावरच ती ‘सॉरी’ म्हणायची, पण अगदी जिवावर येऊन. तिची आजी तिला समजावे, ‘मनू, आपण सॉरी म्हटलं ना की समोरच्या माणसाला समजतं की, मनूला आपली चूक कळलीय. ती पुन्हा तसं करणार नाही. मग त्या माणसाचा राग लगेच शांत होतो. कट्टीची बट्टी होते. आपल्या घरात बघतेस ना आई, बाबा, तातू मी सगळे कसे पटकन सॉरी म्हणतो ते! म्हणणार ना तूही सॉरी..?’’
मनू काहीच उत्तर देत नसे. तिला सगळं कळत होतं पण वळत नव्हतं. काही दिवसांनी शाळेला दिवाळीची सुट्टी लागली. आता हिचा दिवसभर वेळ कसा जायचा म्हणून तिच्या आईने तिला घराजवळच लागलेल्या पुस्तक प्रदर्शनाला नेलं. तिथला छोटय़ा मुलांचा विभाग दाखवून आई म्हणाली, ‘मनू, इथे लहान मुलांसाठी खूप पुस्तकं आहेत. त्यातली तुला हवी ती तू निवड. तोपर्यंत मी माझ्यासाठी पुस्तकं शोधते. फक्त नको असलेली पुस्तकं परत जागेवर ठेवून द्यायची बरं का, सगळा पसारा नाही घालून ठेवायचा..’
रंगीत-रंगीत चित्रांच्या पुस्तकांचा तो खजिना बघून मनू हरवून गेली. मोठय़ा टाईपमध्ये लिहिलेली, मोठी-मोठी चित्रं असलेली पाच पुस्तकं तिने निवडली. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. आपण मोठ्ठं झाल्यासारखं तिला वाटत होतं.
घरी आल्याआल्या हात पाय धुवून झाल्यावर स्वारी पुस्तकं घेऊन आजीच्या मागे फिरू लागली. एकच धोशा सुरू झाला, ‘आजी गोष्ट सांग ना.’
आजी म्हणाली, ‘यातली कुठली गोष्ट सांगूया बरं?’
मनूने पाण्यातील उलटय़ा घागरीवर बसलेल्या मनीमाऊचे चित्रं असलेलं पुस्तक पुढे करून म्हणाली, ‘या माऊची गोष्ट सांग.’
आजीने त्या पुस्तकातली बुडबुड घागरीची गोष्ट तिला सांगितली. मनू लक्षपूर्वक ऐकत होती. गोष्ट संपवताना आजी म्हणाली, ‘मनीमाऊने एकटय़ाने खीर खाल्ली हे बरोबर आहे का?’
मनूने ‘नाही’ या अर्थाने मान हलवली.
आजी पुढे म्हणाली, ‘माऊने खीर तर खाल्लीच, शिवाय तिने कबूलही केलं नाही, की मी खीर खाल्ली म्हणून. देवबाप्पाला तिचं हे वागणं मुळीच आवडलं नाही. म्हणून त्याने तिला शिक्षा केली. तिची घागर बुडून गेली.
‘‘आणि माऊ?’’ मनूचा प्रश्न.
‘‘घागर बुडाल्यावर माऊ पाण्यात पडली. तिच्या नाकातोंडात पाणी गेलं आणि तीही पाण्यात बुडाली. चला, गोष्ट संपली. उठा, आई जेवायला हाका मारतेय..’’ आजीने समारोप केला.
पण मनू कसल्याशा विचारात गढली होती. ती एकदम म्हणाली, ‘‘आजी माऊ बुडाली नाही.’’
‘‘मग?’’
‘‘मग, ती ‘सॉरी’ म्हणाली. मग माकड, कावळा आणि ससा सगळय़ांनी मिळून तिला बाहेर काढलं. बाहेर आल्यानंतर सगळे मित्र ‘रिंगा रिंगा लोरी..’ म्हणत गोल गोल फिरायला लागले, मस्ती करायला लागले, उडय़ा मारायला लागले.’’
आजी मनुकडे बघतच राहिली. इवल्याशा मनूने गोष्टीचा शेवट बदलला होता.. अगदी तिला हवा तसा. आजी समाधानाने हसली.
मनूला ‘सॉरीची किंमत’ आपली आपणच समजली होती.
संग्रहित लेख, दिनांक 15th Dec 2013 रोजी प्रकाशित
सॉरीची किंमत
मनू, वय वर्ष सोडेतीन. एक अतिशय गोड आणि लाघवी मुलगी. आई-बाबा, आजी-तातू (आजोबा), शाळेच्या बाई सगळय़ांची आवडती. फक्त एका बाबतीत मात्र तिच्यापुढे सगळय़ांनी हात टेकले होते.

First published on: 15-12-2013 at 01:06 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story time