नरेंद्र कुळकर्णी
‘‘राघू, अगोदर आत ये पाहू. पाऊस पाहा किती भरलाय. भिजशील मग. भिजायचं नाहीये.’’ आईची हाक ऐकूनही राघव काही खोलीत आला नाही. तो आपला खोलीबाहेरच्या मोठय़ा मोकळय़ा गच्चीत उभा राहिला आणि पावसाची वाट पाहू लागला. शेवटी आई आलीच गच्चीत आणि राघूचं बकोट पकडून त्याला घरात घेऊन गेली.
राघवला पाऊस खूप आवडायचा. पाहायला आवडायचा. त्याचा आवाज ऐकायला आवडायचा. पाऊस आला की सुटणारा वारा आणि त्याच्याबरोबर येणारा गारवा त्याला आवडायचा.
‘‘मग तो समोरचा उदू कसा गं भिजतो?’’ राघव विचारायचा.
‘‘तो भिजतो नि मग आजारीही पडतो.’’ आई म्हणायची.
‘‘अगं आई, तो आजारी पडतो न् मग बराही होतो ना?’’ असा संवाद त्यांच्यात नेहमी व्हायचा. पण आई राघवला पावसात भिजू काही द्यायची नाही. राघवचे बाबा कामानिमित्तानं बाहेरगावी असायचे. त्यामुळं आई एकटीच असल्यानं राघवच्या तब्येतीकडं ती जास्तच लक्ष पुरवी.
समोरच्या इमारतीत राहणारा उदय हा राघवच्याच शाळेत होता. राघव चौथीत तर उदय पाचवीत. त्याचं कुटुंब खूप हौशी होतं. सुट्टीचा दिवस आणि पाऊस पडायचा अवकाश, की हे सर्व आलेच त्यांच्या गच्चीत भिजायला. उदू, त्याचे आई-पप्पा, काका-काकू, चुलत बहीण असे सर्व पावसात भिजायची मज्जा करत. खिडकीतून खट्टू चेहऱ्यानं बघणाऱ्या राघवला उदय बोलावत असे. त्याचे आई-पप्पाही बोलावत, पण राघवला भिजायला पाठवण्यास आईस धीर होत नसे.
राघव पावसाकडे बघत बसला असतानाच दादाची बेल वाजली. आईनं त्याला दार उघडायला सांगितलं. त्यानं दार उघडलं तर समोर साक्षात मामा उभा. त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलण्यास तेवढं एक कारण पुरेसं ठरलं. कारण मामा घरी आला की त्याची मज्जा असायची. आई नेहमीच छानछान पदार्थ करी. पण मामा आला की त्याच्याशी गप्पा मारत आईनं केलेले पदार्थ अधिक गोड लागत. आई आणि मामामध्ये शब्दांच्या सवाल-जबाबाचा खेळ रंगे. म्हणजे की, आई राघवला म्हणे, ‘‘बाहेर कित्ती पाऊस, राघू, भरपूर नको खाऊस!’’ यावर मामा त्वरित म्हणे, ‘‘बाहेर कित्ती पाऊस, राघवा भरपूर खा ऊस!’’ आई कपाळाला हात लावून म्हणे, ‘‘आता मध्येच हा ऊस कुठून आला?’’ अशी काहीही गंमत चाले.
काही कामानिमित्त मामा घरी आला होता. रात्री तो आईला म्हणाला, ‘‘पुढे चार दिवस लागून सुट्टी आलीय. तुम्ही दोघं चला की गावाला छानपैकी.’’ कामामुळे तिला जाणंकाही शक्य नव्हतं, पण भावानं खूप आग्रह केल्यानं राघवला पाठवायला ती राजी झाली. आणि राघवची स्वारी निघाली गावी. गावात सकाळी जाग आल्यावर राघू पाहतो तर काय, खिडकी हिरव्या फांद्यांनी भरून गेलेली. त्यांच्यामधून पावसाचं पाणी ओघळत होतं.
‘‘मामा, काय मस्त रे हे. चल, बाहेर जाऊ या.’’ मामा हसला. मामीनं केलेल्या घावन-चटणीची चविष्ट न्याहारी झाली. मग राघूला घेऊन मामा निघाला. हवा थंडगार होती. छोटा रस्ता पावसानं ओला होऊन चमकत होता. झाडं चिंब होती. दोन छोटे पक्षी आपले पंख फडफडवीत पाणी झटकत होते. कुठं गाय मोठय़ानं हंबरली. राघू आणि मामा खुशीत आले. शेतातली पायवाट चालून ते गावच्या नदीकाठी आले.
‘‘मामा, कित्ती रे हे काळे मोठ्ठे ढग!’’ त्यांनी पाण्यात पाय बुडवले. राघू आपले हात पाण्यावर फिरवू लागला. इतक्यात अचानक तो ओरडला, ‘‘मामा मामा, अरे इथं पाहा मासे!’’ त्याचे डोळे व तोंड विस्फारलं होतं. मामा हसून भाच्याचं कौतुक पाहत होता. मग अचानक झालं काय, तर दूर माळावरून घुमल्यासारखा कसलासा मोठ्ठा आवाज आला. वारा जोरात वाहतो ना, तस्सा! आणि पावसाची भली मोठ्ठी सर लांबून आपल्याकडं येताना त्यांना दिसली.
‘‘आता रे काय मामा?’’
‘‘काय म्हणजे? भिजायचं! पावसात भिजायचंय ना तुला?’’
‘‘काय म्हणतोस मामा? खरंच?’’ आणि राघू नाचू लागला.
मग काय, पावसाच्या मस्त सरींमध्ये राघू भीज भीज भिजला. अगदी मनस्स्सोक्क्क्त!!! पावसाच्या सरी नदीच्या पाण्यावर पडताना उठणारे तरंग तो हातात पकडू लागला. तेव्हा मासे धुम्म पळाले. राघू आनंदानं नुसता बागडत होता. तसेच बागडत ते घरी परतले.
घरी मामी तयारीत होती. कोरडय़ा टॉवेलनं तिनं राघूला पुसून चांगलं कोरडं केलं. मग गरम पाण्यानं अंघोळ घातली. हळदीचं गरम दूध प्यायला दिलं. नंतर मामीनं कांद्याची गरमागरम भजी केली, ती त्यांनी पावसाच्या गोष्टी बोलत फस्त केली. दिवसभर झाडांमधून पडणारा पाऊस पाहून त्या आनंदात किती भिजू किती नको असं राघूला झालं. रात्री कोरडी जागा पाहून मामानं शेकोटी बनवली. भुईमुगाच्या भाजलेल्या उनहुनीत शेंगा आणि जोडीला कित्तीतरी गप्पा होत्याच.
‘‘पण रे मामा, आई खूप रागावणार आता.’’ राघूला मग मामानं एक गुपित सांगितलं. ते म्हणजे त्यानं आईची परवानगी घेतली होती! रात्री शांत निजलेल्या राघूच्या ओठांवर पावसाच्या जम्माडी गमतीचं हसू पाहून मामा-मामीच्या ओठीही हसू फुललं होतं.
narenkul59@rediffmail.com