आपल्या देशात राजकीय आणि सामाजिक पातळीवर अनेक परस्परविरोधी प्रवृत्ती दिसतात. उदाहरणार्थ, एकाच वेळी महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानले जाते आणि दुसरीकडे त्यांची हत्या करणाऱ्याची मंदिरं उभी केली जातात. हत्या करणारा देशभक्त आणि ज्याची हत्या झाली तो राष्ट्रपिता? आपल्या या विचित्र देशात आणखी एक प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो, खरंच गांधींमुळे भारताची फाळणी झाली होती का? पाकिस्तानच्या निर्मितीमागे महात्मा गांधींचा हात होता का? या प्रश्नांकडे सामान्यांनी कसे पहावे?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंदुत्ववाद्यांनी नेहमीच गांधीजींचा द्वेष केला. मुस्लीम वेगळा देश मागत होते. हिंदुत्ववाद्यांना त्यांचा फारसा द्वेष वाटला नाही. त्यांचा सगळा तिरस्कार अखंड भारत टिकविण्यासाठी सतत मुस्लिमांना सांभाळून घेणाऱ्या गांधीच्या विरुद्ध उफाळून आला. अखंड भारतात बंगाल, पंजाब, सिंध आणि वायव्य सरहद्द प्रांत हे चार प्रांत मुस्लीम बहुसंख्येचे होते. काश्मीरही मुस्लीम बहुसंख्येचे होते. या भागात अखंड भारतवादी शक्तींनी निवडणूक जिंकल्याशिवाय अखंड भारत निर्माण होणे शक्य नव्हते. शनिवार वाडय़ासमोर ‘हिंदुस्थान हिंदुओं का’ अशी घोषणा करून सिंध, पंजाबच्या निवडणुका कशा जिंकता आल्या असत्या? आज काश्मीर विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अकरा अधिक दहा असे एकवीस हजार कोटींची केंद्राची मदत असूनही काश्मीर खोऱ्यात एकही जागा भाजपला निवडून आणता आलेली नाही हे वास्तव आहे. पण हिंदू हे एक स्वयंभू राष्ट्र असून मुस्लीम हे आपल्यापेक्षा पृथक राष्ट्र आहे, हेच तर हिंदुत्ववाद्यांचे कायमचे तुणतुणे होते. मुस्लीम हे वेगळे राष्ट्र असतील तर त्यांची बहुसंख्या असणारा प्रदेश हिंदुस्थानच्या बाहेर जाणारच, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ होती. फाळणी टाळण्यात गांधींना अपयश आले हे कुणीही नाकारणार नाही. पण ते का आले, याचा तटस्थपणे अभ्यास केला पाहिजे.

गांधी मुस्लिमांशी करारामागून करार करत टिळक – गोखल्यांच्या वाटेने निघाले असते तर भारत अखंड राहिला असता. पण ४० कोटी हिंदूंचे (भारतीयांचे) जीवन सांस्कृतिकदृष्टय़ा उद्ध्वस्त झाले असते आणि भारताचे भविष्य राजकीयदृष्टय़ा अंधारलेले असते. हिंदूंचे भवितव्य उद्ध्वस्त होऊ देण्यास गांधीजी तयार नव्हते, म्हणून फाळणी टळू शकली नाही. मुस्लीम समाजाला वेगळे राष्ट्र मिळत असताना त्यांना अल्पसंख्य म्हणून राहण्यात रस कसा असणार? शिवाय त्यांच्या मदतीला इंग्रजांची फुटीर नीती होतीच म्हणून त्यांना जबरदस्तीने भारतात ठेवणे शक्य नव्हते आणि ते लोकशाही, अहिंसा तसंच मूल्यविरोधी होते. म्हणून गांधीजी अखंड भारत टिकवण्यात अयशस्वी झाले. गांधीजींचे हे अपयश मान्य केले तरी अखंड भारत टिकविण्याची लढाई ते सर्व सामर्थ्यांनिशी खेळले होते. पण ज्यांनी लढाच दिला नाही, अखंड भारत टिकविण्याची लढाई देण्यापूर्वी ज्या मंडळींनी मुस्लीम लीगचा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मान्यच करून टाकला त्यांचे वर्णन कसे करावे? अखंड भारताचा तोंडाने जयघोष करत या मंडळींनी द्विराष्ट्रवाद मान्य केला आणि अखंड भारत टिकविण्यासाठी लढण्याऐवजी युद्धापूर्वीच रणातून पळ काढला.
नरहर कुरुंदकरांनी ‘जागर’, ‘शिवरात्र’ या ग्रंथात ही मांडणी केली आहे. तर ‘काँग्रेसने आणि गांधींनी अखंड भारत का नाकारला?’ या प्रश्नाचे अधिक अभ्यासपूर्ण चिंतन प्रा. शेषेराव मोरेंनी मांडले. जिज्ञासूंनी ही पुस्तके वाचावीत जेणेकरुन तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीत गांधींनी समस्यांशी दोन हात कसे केले याबाबत व्यापक माहिती मिळेल.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahatma gandhi partition of india mppg