– दिनेश गुणे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मित्रवर्य मंदार अनंत भारदे याची बघ्याची भूमिका आता ‘एकगठ्ठा’ वाचायला मिळणार हे प्रत्यक्ष त्याच्याकडून आणि त्याच्या फेसबुकवरून कळले आणि पुस्तक हातोहात संपल्यामुळे येणारी निराशा टाळण्यासाठी लगेच ऑनलाईन खरेदीसाठी नंबर पक्का करून टाकला. (नंतर कधीतरी तो पार्टी देईल तेव्हा त्यावर त्याची सही घेणार आहे.) भारदे नावाचे हे ‘रसायन’ मला पहिल्यांदा जेव्हा भेटले तेव्हाच त्याची जबरदस्त ‘किक’ (लहान) मेंदूत बसली होती. या माणसाकडून ऐकणे हा एक विलक्षण अनुभव असल्याने त्यांच्यावर लिहिलेच पाहिजे असे मला वाटू लागले आणि लोकसत्ताच्या रविवारच्या ‘लोकरंग’ पुरवणीत ‘बावनकशी’ सदरात मी त्यांच्यावर लेख लिहिला. त्या निमित्ताने मंदारशी गांभीर्याने गप्पा मारल्या आणि लक्षात आले की या माणसावर आपण लिहिण्यात मजा नाही, तर त्याने स्वत: लिहिते होण्यात खूप मजा आहे…

मग आम्ही काही मित्रांनी- मी, मनोज गडणीस, अजित अनुशाही आदींनी एका रात्री ‘बसून’ प्रदीर्घ चर्चा केली, ‘धोरण’ ठरले, आणि मंदार ‘लिहिता’ झाला. तसा फेसबुक, ब्लॉगवरून मंदारची खास शैली वाचकांपर्यंत पोहोचलीच होती, पण ‘लोकसत्ता’सारख्या दैनिकात मंदारची लेखणी आणखी चपखल बसली. ‘लोकरंग’ पुरवणीतील त्याच्या ‘बघ्याची भूमिका’ या सदराने वाचकप्रेमाची अमाप उंची गाठली.

माणसाला मन नावाचा एकच अदृश्य अवयव असतो. पण मंदार भारदे नावाच्या या माणसाला अनेक मने आहेत, हे त्याच्या प्रत्येक लेखानंतर जाणवत गेले. आसपासच्या घडामोडींवरील भाष्य अत्यंत संवेदनशीलपणाने, पण त्याच्या खास, म्हणजे गंभीर आणि मिस्कील शैलीच्या मिश्रणातून त्याच्याकडून ऐकण्यात किंवा त्याच्या लिखाणातून वाचण्यात एक मजा असतेच, पण ते केवळ विनोदाच्या चौकटीत पाहात खळखळून हसावे आणि विसरून जावे असे कधीच नसते. ते मनात रुतून बसते, अंतर्मुख करते आणि नवा विचार करायला भाग पाडते. असा अनुभव अनेकदा आल्याने, या माणसाला ओळखण्यासाठी, जाणून घेण्यासाठी मी त्याचा ‘पाठलाग’ सुरू केला. अलीकडच्या काही भेटींतून मला तो थोडासा उलगडत गेला, तरीही अनेकांप्रमाणेच हा ‘संपूर्ण भारदे’ मलाही समजलाच नाही. मग मी त्याचे लिखाण वाचत गेलो. नाशिकचे दिवंगत लेखक मुरलीधर खैरनार यांच्या ‘शोध’ नावाच्या प्रचंड गाजलेल्या कादंबरीच्या लेखनप्रक्रियेत मंदार भारदे कसे सामावून गेले होते हे जाणवत गेले आणि त्याचे अनेक पलू एक एक करीत उलगडत गेले.

केवळ गप्पांमध्ये खिळवून ठेवणारा, विचारांना चालना आणि वेगळी दिशा देणारा, एवढेच मंदार भारदेंचे पैलू नाहीत. त्यापलीकडचेही, जगाने नोंद घ्यावी असे एक अफलातून वेगळेपण त्याच्याकडे आहे. सामाजिक भान घरातूनच मनात रुजलेले. तरीही प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सकपणे पाहण्याच्या आणि वेगळ्या कोनातून विचार करण्याच्या सवयीतून मंदारला वेगळ्याच कोनातून गांधीही उलगडले आणि त्या कोनातूनच त्याने आजच्या राजकारणाकडेही पाहायला सुरुवात केली. त्यामुळेच, खुमासदार शैलीतील त्याचे राजकारणाचे भाष्य ऐकणे हा एक अनुभव असतो. नेता हा कधीच गरीब, केविलवाणा दिसता कामा नये. तो राजासारखा ऐश्वर्यसंपन्न असला पाहिजे, समाजाचे प्रश्न सोडविण्याची ताकद त्याच्या व्यक्तिमत्त्वात दिसली पाहिजे, असे काही विचार खुमासदारपणे आणि तिरकसपणे मांडत मंदार राजकारणाचे त्याचे असे खास लॉजिक उलगडू लागला की त्या विनोदातही एक विदारक वास्तवाचे अदृश्य पैलू दिसू लागतात.

मंदारच्या बघ्याची भूमिका या सदरातील प्रत्येक खुमासदार लेखातून तुमच्याआमच्या जीवनशैलीतील रटाळ, कंटाळवाण्या क्षणांना शोभादर्शकातील रंगीबेरंगी चित्रांची किनार लाभली आहे. तेव्हा हा शोभादर्शक हाताळण्यासाठी प्रत्येक रविवारची प्रतीक्षा करावी लागत होती. आता ते पुस्तक हाती आल्यावर, मनात येईल तेव्हा, मनास वाटेल तितक्या वेळा, हे रंगीबेरंगी शोभादर्शक न्याहाळता येईल. … आणि, मुख्य म्हणजे, मंदारने हलक्याफुलक्या शैलीत लिहिलेले हे पुस्तक वास्तवात अंतर्मुख करणारे आहे, हेही लक्षात येईल. कारण, ‘बघ्याची भूमिका’ हा एक ‘बावनकशी’ ऐवज आहे.
मंदारच्या या लेखांचा संग्रह मॅजेस्टिकने प्रकाशित केलाय. http://www.mandarbharde.com वर जाऊन नक्की विकत घ्या आणि मनमुराद हसा…!

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mandar bharde marathi book baghyachi bhumika