ब्लॉग : आझाद हिंद सेनेचे ध्येयजनक वीर सावरकरच !

इतिहासाचा डोळस मागोवा घेतला तर लक्षात येते की, आझाद हिंद सेनेचे ध्येयजनक वीर सावरकरच होते. इतकेच नव्हे तर तिच्या उभारणीत मूलभूत भूमिका असणारे सुद्धा तेच होते.

azad hind fauj veer savarkar
ज्यावेळी आपण आझाद हिंद सेनेचा विचार करतो, त्यावेळी आपल्या डोळ्यांसमोर पहिली प्रतिमा सुभाषचंद्रांची अन् शेवटची रासबिहारी बोसांची येते. (फाइल फोटो)

-डॉ नीरज देव

यावर्षी नेताजी सुभाषचंद्रांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधत पंतप्रधानांनी त्यांच्या प्रतिमेचे अनावरण केले. त्याचवेळी आझाद हिंद सेनेचे स्मारक लाल किल्ल्यावर करणार असल्याचे प्रतिपादन केले. हे निश्चितच अभिनंदनीय आहे. या स्मारकात काय काय असणार याची लेखकाला कल्पना नाही, पण त्यास्मारकात वीर सावरकरांना त्यांचे यथोचित स्थान मिळावे या हेतुने हा लेखप्रपंच.

ज्यावेळी आपण आझाद हिंद सेनेचा विचार करतो, त्यावेळी आपल्या डोळ्यांसमोर पहिली प्रतिमा सुभाषचंद्रांची अन् शेवटची रासबिहारी बोसांची येते. यात वीर सावरकरांची आठवण कुठेच येत नाही. इतिहासाचा डोळस मागोवा घेतला तर लक्षात येते की, आझाद हिंद सेनेचे ध्येयजनक वीर सावरकरच होते. इतकेच नव्हे तर तिच्या उभारणीत मूलभूत भूमिका असणारे सुद्धा तेच होते. त्यामुळे आझाद हिंद सेनेत सावरकरांची भूमिका अभ्यासणे उचित ठरेल.

सावरकरांची स्वातंत्र्ययुध्दाची संकल्पना

‘रणांगणाशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही ! ’ ही सावरकरांची स्वातंत्र्ययुध्दाची संकल्पना अगदी कोवळ्या वयात अत्यंत स्पष्ट होती. सावरकरांची ही संकल्पना ‘चार दोन इंग्रजांना मारल्यास, इंग्रज घाबरुन देश सोडून जातील.’ एवढी भाबडी ही नव्हती नि ‘ सर्व भारतीय जनता सशस्त्र क्रांतीत उतरेल.’ एवढी भोळी ही नव्हती. तर अत्यंत वस्तुनिष्ठ नि प्रयोगशील होती. ती अगदी संक्षेपात खालील प्रकारे मांडता येईल –
१. देशभर गुप्त मंडळ्यांचे जाळे उभारावे.
२. प्रत्येक गुप्त मंडळीचे प्रकट नि छुपे असे दोन भाग असावेत.
३.प्रकट भागाचा उपयोग जनजागृती नि निःशस्त्र आंदोलनासाठी करावा. (१९०५ साली केलेली विदेशी कपड्यांची होळी याचेच बोलके उदाहरण होय.)
४.शत्रूवर छोटे छोटे छापे सदैव टाकीत रहावे.
५. इंग्रजी सैन्यात असलेल्या भारतीय सैन्यात असंतोष पसरवून सैनिकांनाच सरकार विरुध्द बंड करुन उठवावे.
६.‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ‘ या न्यायाने इंग्रजांच्या शत्रू देशांसोबत मैत्री वाढविणे त्यांच्याकडून युध्दसामग्री, द्रव्यसामग्री नि परायज आला तर आश्रयही मिळण्याची तजवीज करणे.
७. इंग्रज एखाद्या महायुध्दात फसलेले असताना संधी साधून बंड करुन उठणे.
८.पहिल्या प्रयत्नात अपयश आले तर दूसरा प्रयत्न करणे, दुस-यात आले तर तिसरा याप्रमाणे यश येईतो झुंजत राहणे. (स सा वा खंड ०१)

सदरहू योजनेत सर्वच जणांनी सशस्त्र होऊन लढावे अशी अवास्तव अपेक्षा ते बाळगत नव्हते. केवळ दोन लाख देशभक्त सशस्त्र होऊन उतरले तरी काम होईल असे त्यांना वाटे. अर्थात त्यामागे करोडो जनतेचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहाय्य असावे असे त्यांस वाटे.

सावरकरांनी बनविलेली ही योजना नि त्याबरहुकूम केलेले प्रयास पाहून प्रा. नरहर कुरुंदकरांसारख्या सावरकरांच्या हिंदुत्ववादाला विरोध असणा-या पुरोगाम्यालासुध्दा सावरकरांपुढे नतमस्तक होण्यावाचून राहवत नाही. ( अन्वय पृ २७-२८)

उपरोक्त योजनेतील ५, ६ व ७ चे मुद्दे आझाद हिंद सेनेचा नकाशाच दाखवतात.

१८५७ चे स्वातंत्र्यसमर – आझाद हिंद सेनेची ब्ल्यु प्रिंटच

१८५७ साली इंग्रजांच्या सेनेत असणा-या भारतीय सैनिकांनी उठाव करीत इंग्रजांविरुध्द युध्द पुकारले. या उठावाला इंग्रजांनी ‘शिपायांचे बंड ‘ संबोधत हेटाळले. त्याचप्रमाणे एतद्देशीय नेत्यांनी त्यास राजद्रोह, बंड याच नावाने पाहिले. त्यामुळे त्याचा उल्लेख ही नेत्यांना नि जनतेला पाप व गुन्हा वाटू लागला.

स्वा सावरकर पहिले भारतीय नेते होते, ज्यांनी १८५७ सालच्या सैनिकी उठावाला भारताचे पहिले स्वातंत्र्यसमर म्हणत गौरविले. सावरकरांनी ज्या त्वेषाने नि दमदारपणे हा ग्रंथ लिहिला, त्याचा सुगावा लागताच त्या ग्रंथाला प्रत्यक्ष१८५७ सालच्या युध्दासारखे घाबरत इंग्रज सरकारने त्यावर प्रकाशनपूर्व बंदी घातली. भारत, इंग्लड वा फ्रान्स यापैकी कोठेच तो प्रकाशित करता येणार नाही. हे पाहिल्यावर सावरकर व त्यांच्या सहका-यांनी तो नेदरलंडमधून गुप्तपणे प्रकाशित करीत इंग्रज सरकारला चांगलाच टोला दिला.

या ग्रंथाला सावरकर प्रयोगसिध्द नि प्रस्फोटक इतिहास म्हणतात. प्रयोगसिध्द म्हणजे १८५७ साली सैनिकांनी जी कृती केली ती पुन्हा केली जाऊ शकते नि प्रस्फोटक म्हणजे ग्रंथ वाचून तशी आस युवकांच्या मनात पेटू शकते. सावरकरांच्या या महाग्रंथाने हजारोहजार हुतात्म्यांची सेनाच उभी केली, अशी इतिहासाची साक्ष आहे. गदरचे गदरी असोत, आझाद हिंदचे सैनिक असोत किंवा इतर संघटनांचे क्रांतिकारक असोत, सर्वांनाच या ग्रंथाने आत्माहुतीची ज्वलंत प्रेरणा दिली. याचा सर्वोत्तम पुरावा म्हणजे याला लाभलेले लाला हरदयाळ, भगतसिंह नि सुभाषचंद्रांसारखे तीन तीन दिग्गज क्रांतिकारक नेते हेच होत. त्यामुळेच म्हणावे लागते गदर असो वा आझाद हिंद सेना दोहोंची ब्ल्यू प्रिंट म्हणजे हा ग्रंथच होय.

१८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या धर्तीवर ब्रिटिश सैन्यात उठाव केलेल्या सैनिकातून सेनेची निर्मिती, राणी झाशी रेजिमेंट, याच ग्रंथातील ‘चलो दिल्ली’ ची उत्तेजक गर्जना, इतकेच नव्हे तर नेताजी सुभाषचंद्रांनी केलेले सावरकरांच्या १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाचे प्रकाशन नि वितरण या सा-या बाबी वीर सावरकरांचे १८५७ चे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथच आझाद हिंद सेनेची ब्ल्यु प्रिंट होता हीच बाब अधोरेखित करतात.

याला आणखी एक सज्जड पुरावा म्हणजे १९४६ साली; आझाद हिंद सेनेची घटना ताजी असताना वीर नरीमान यांनी काढलेले पुढील उद्गार होत, ‘’वीर सावरकरांच्या १८५७ चे स्वातंत्र्यसमरातूनच आझाद हिंद सेनेची संकल्पना साकारली असेच प्रतीत होते. राणी झाशी रेजिमेंट ही त्याचाच अविष्कार आहे.‘’ ( फ्री हिंदुस्तान सावरकर अंक)

येथे हे ही स्पष्ट करणे अनुचित ठरणार नाही कि जवळपास अशीच योजना सावरकर नि त्यांच्या सहका-यांनी पहिल्या महायुध्दात वापरली होती. लाला हरदयाळ, भाई परमानंद, वीरेंद्रनाथ चटोपाध्याय, एम पी टी आचार्य, खानखोजे, पिंगळे, कर्तारसिंग सराभा इ सावरकरांच्या अनुयायांनी अन् सहका-यांनी प्रामुख्याने जर्मनी व इतर इंग्रज विरोधी राष्ट्रांशी संधान बांधून बर्लिन, मध्यपूर्व नि अफगाण अशा तीन ठिकाणी हंगामी सरकारे स्थापन केली होती. जी आझाद हिंद सरकारच्या जवळपास तीस वर्षे आधी होती.

अधिक तपशीलात न जाता येथे एवढेच स्पष्ट करणे गरजेचे आहे कि पहिल्या महायुद्धातील या उठावाचे नेते रासबिहारी बोस होते. त्यांनीच दुस-या महायुध्दात आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती.

दुस-या महायुध्दाची चाहूल तब्बल दशकापूर्वी

वीर सावरकर असे एकमेव नेते होते, ज्यांना दुस-या महायुध्दाची चाहूल सन १९२८ मध्येच लागली होती. सा श्रध्दानंदच्या १६ फेब्रुवारी ते ८ मार्चच्या अंकांत ‘आगामी महायुध्दाची संधी दवडू नका’ या मथळ्याचे चार लेख त्यांनी प्रकाशित केले होते. या लेखमालेत देशाच्या स्वातंत्र्यासाठी महायुध्दाचा उपयोग आपण कसा करायला हवा. याचा जितका देता येईल तितका तपशील सावरकर देतात. येथे ही बाब लक्षात ठेवायला हवी कि, ज्याकाळात सावरकर हे लेख लिहित होते, त्याकाळात त्यांच्यावर अनेक बंधने होती. नि अंदमानातून सुटून त्यांना जेमतेम चार वर्षेच उलटली होती.

या लेखमालेत ते रशिया नि इंग्लडमध्ये युध्द होणार असल्याची संभावना व्यक्त करतानाच, शेवटच्या घडीपर्यंत काय घडेल हे नेमके सांगता येणार नाही. कदाचित रशिया इंग्लड मध्ये युध्द न होता इतर कोणत्यातरी राष्ट्रात होईल. मात्रं त्यात इंग्लड निश्चितच असेल. आपण याचा आपल्या देशाच्या हितासाठी लाभ उठवायला हवा. असे जवळपास दशकभर आधी भाकीत करीत होते. येथे हे लक्षात घ्यायला हवे की या काळात सुभाषचंद्र गांधी नि काँग्रेसच्या राजनीतिला सर्वोच्च मानत होते.

सैनिकीकरणाचे आवाहन

१९३८ साली मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन या सरस्वतीपुत्राने महाकालीला आवाहन करताना ‘ लेखण्या मोडा ! बंदुका उचला ’ ची रणगर्जना केली होती. युवकांना उद्देशून वीर सावरकर म्हणाले होते, ‘ पुढील पिढीत एकही कवि, लेखक झाला नाही तरी चालेल पण प्रत्येकजण सैनिक झाला पाहिजे.’ केवळ यावरच न थांबता; इंग्रजांनी दूस-या महायुध्दासाठी सैन्यभरतीची सुरवात करताच सावरकर युवकांनी सैन्यात दाखल व्हावे म्हणून प्रचारीत सुटले. जाहिर सभेत बोलताना सावरकर सांगत, ‘आमच्याकडे एक पिस्तूल सापडले, म्हणून इंग्रजांनी आम्हाला काळ्यापाण्यावर धाडले. पण आता तेच इंग्रज सरकार तुम्हाला बंदुका देतेय, ते चालविण्याचे प्रशिक्षण देतेय आणि पगार ही देतय. मग जा ! बंदुका चालवायला शिकून घ्या.‘ कधी कधी बोलण्याच्या ओघात ते बोलून जात , ‘ एकदा बंदुका शिकले कि कोणत्या दिशेला वळवायच्या ठरविता येईल.’

स्वा सावरकर गावोगाव असा प्रचार करताना कांग्रेसचे तत्कालीन नेते सावरकरांना रिक्रूटवीर अर्थात् ब्रिटिश सैन्याचा सैन्यभरती अधिकारी म्हणून हिणवीत होते. नियतीचा फेरा असा कि त्याच कांग्रेसचा अध्यक्ष काही वर्षातच सावरकरांनी भरती केलेल्या याच सेनेचा नेताजी होणार होता.

इंग्रजांच्या साम्राज्यलालसेचा भंडाफोड

कुठल्याही युध्दामागे उदात्त ध्येय नसेल तर सैनिकात पाहिजे तसे मनोबल निर्माण होत नाही. धर्म, राष्ट्र, सत्य, न्याय इ मूल्येच सैनिकांत बलिदानाची प्रेरणा जागवतात. हे सावरकरांना ज्ञात होते. पण दूसरे महायुध्द स्वतःचे साम्राज्य निर्माण करु इच्छिणा-या नि स्वतःचे साम्राज्य राखू इच्छिणा-या दोन साम्राज्यशाही राष्ट्रगटात होत होते, हे ही ते चांगलेच ओळखून होते. आपल्या युध्दहेतुला मानवता नि नैतिकतेचा मुलामा देण्यासाठी इंग्रज ‘आम्ही हिटलर नि मुसोलिनी या हुकुमशहांचा अंत करण्यासाठी लढतोय.‘ अशी शेखी मिरवित होते. कांग्रेसचे बहुतांश नेते इंग्रजांच्या या ढोंगी घोषणेला बळी पडले होते. यात अपवाद सुभाषचंद्रांचा होता.

आपली खोटी ब्रीदे जगासमोर ठेवताना दि १४ ऑगस्ट १९४१ रोजी ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनी अटलांटीक सनद सादर केली होती. जीत पारतंत्र्यातील देशांना स्वातंत्र्य देण्याची घोषणा होती. या सनदेचा हवाला देत सावरकरांनी चर्चिलला तार करीत विचारले होते कि, ‘त्या पराधीन राष्ट्रात आपण भारताचा समावेश करता की नाही?’ चर्चिलने सावरकरांना तुमची तार पोहोचल्याचा निरोप दिला, पण प्रश्नाचे उत्तर टाळले होते. २० ऑगस्ट १९४१ रोजी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष रुझवेल्टला तार करीत सावरकरांनी विचारले होते कि, ‘ ज्या सनदेची चर्चा होतेय, तीत भारताच्या स्वातंत्र्याची हमी आपण इंग्लडकडून घेतलीय का? घेतली असेल, तर तशी जाहीर घोषणा करा. नाहीतर हे साम्राज्यवाद्यांचे युध्द आहे हेच सिध्द होईल. आपली साम्राज्यलालसा लपविण्यासाठीच अटलांटीक सनदेची पोकळ घोषणा आपण केलीय, अशीच करोडो भारतीयांची भावना होईल.’ या तारेला अमेरिका, इंग्लड, जर्मनी, जपान, भारत इ देशात चांगलीच प्रसिध्दी मिळाली. येथे सावरकर हिटलर, मुसोलिनीला सुध्दा साम्राज्यवादीच म्हणतात हे ध्यानात ठेवायला हवे.

सावरकरांनी पुन्हा अशाच आशयाची विचारणा केली असता, चर्चिल त्याच्या नेहमीच्या फटकळपणात बोलून गेला, ‘ ही सनद केवळ नाझी साम्राज्यातील परतंत्र देशांना लागू राहिल.’ त्याने बोलण्याचाच उशीर कि सावरकरांनी २२ सप्टेंबर १९४१ ला रुझवेल्टला तारेने विचारले, ‘चर्चिलच्या वक्तव्याशी आपण सहमत आहात का? आपण स्पष्टपणे बोला, नाहीतर मौन राखत चर्चिलचे समर्थन करा.’ रुझवेल्ट मौन राहिले. मात्र सावरकरांच्या तारशृङ्खलांचा पुरेपूर वापर हिटलरच्या प्रचारकांनी केला.

सावरकरांच्या या तारांनी मित्रराष्ट्रांच्या पोकळ मानवतावादाचा वैश्विक स्तरावर भंडाफोड केला. इंग्रज असो वा जर्मनी स्वतःच्या साम्राज्यलालसेकरताच लढतात. हे भारतीय सैनिकांच्या लक्षात आल्याने इंग्रजांविरुध्द बंड करायला ते नैतिकदृष्ट्या तयार झाले.

रासबिहारी सावरकरांच्या मार्गावर

संपूर्ण आयुष्यात सावरकर अन रासबिहारी एकमेकांना कधीही भेटू शकले नाहीत. मात्र पहिल्या महायुध्दापासून रासबिहारी सावरकरांना नि सावरकरांच्या विचारांना जाणत होते. त्यामुळेच सावरकरांची रत्नागिरीच्या स्थानबध्दतेतून सुटका होतेवेळी अभिनंदन केलेल्या जाहिर पत्रकात ते ‘सावरकर माझे प्रेरणापुरुष आहेत.’ ची प्रकट घोषणा करतात. सावरकर नि अरविंद घोषांनंतर ज्याचे नाव अग्रक्रमाने घ्यावे इतक्या उच्चकोटीचे क्रांतिकारक रासबिहारी बोस होते. सावरकरांच्या हिंदुत्चाच्या मार्गाला अनुसरत त्यांनी जपानमध्ये हिंदु सभेची स्थापना केली होती. दोन मोठया लेखातून त्यांनी सावरकरांचे चरित्र जपानी वृत्तपत्रातून प्रकाशित केले होते. दूस-या महायुध्दाच्या आधीपासून ते सावरकरांच्या संपर्कात होते. सा फ्रि हिंदुस्थानच्या २७ जानेवारी १९४६ च्या अंकात प्रकाशित बातमीनुसार सावरकरांना अभिवादन करताना ते म्हणाले होते, ‘सावरकरजी, आकाशवाणीवरुन आपणास अभिवादन करताना माझ्या वरिष्ठ सहका-याला मानवंदना देत असल्याचा आनंद मला लाभतोय. आपणास वंदन करणे म्हणजे प्रत्यक्ष त्यागास वंदन करणे होय….. शत्रूंच्या परराष्ट्रनीतिवर आपण आपली राजनीति आधारीत ठेऊ नये हा आपला प्रचार आपल्या दूरदर्शी राजकारणाचा नि योग्य निदानाचा पुरावाच आहे… ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या राजनीतितील सूत्रानुसार इंग्रजांच्या शत्रूंशी हातमिळवणी करीत आपण आपल्या स्वातंत्र्याचा लढा लढायला हवा हा आपण दाखविलेला मार्ग स्वातंत्र्यप्राप्तीचा खरा मार्ग आहे.”

रासबिहारींचे वरील वक्तव्य आझाद हिंद सेनेचा संस्थापक सावरकरी तत्वज्ञानाच्या किती प्रभावात होता हे दाखवायला जसा पूरेसा आहे तसाच सावरकरांच्या मार्गानेच आझाद हिंद सेना कशी मार्गक्रमण करणार होती, हे दाखवायलाही उपयोगी आहे.

आझाद हिंदचे सैन्यबल सावरकर निर्मित

नेताजी आझाद हिंद सेनेला जाऊन मिळायच्या दोनवर्षे आधी नि आझाद हिंद सेनेची निर्मिती प्रक्रिया चालू असताना दि ११ फेब्रुवारी १९४१ ला सिंगापूर येथे एक घटना घडली. कॅप्टन मोहनसिंग नि प्रीतमसिंग यांच्या नेतृत्वाखाली आगेकूच करणा-या पाच हजाराच्या आझाद हिंद सेनेपुढे सुमारे पंचेचाळीस हजार सैनिकांची ब्रिटिश सेना उभी ठाकली. आझाद हिंदचा नेता त्या सैनाला एकट्याने सामोरा गेला. त्याने त्या सैन्याच्या देशभक्तीला आवाहन करताच, आश्चर्य घडले सुमारे ४५,०००ची सेना त्यातील ब्रिटिश अधिकारी वगळता, रक्ताचा एकही थेंब न सांडता, आझाद हिंद सेनेला येऊन मिळाली. या घटनेचे वर्णन करताना जपानी लेखक ओहसावा लिहितात,

‘’ The chief of the Indian National Army proceeded alone to the frontline and talked to Indian officers and soilders in the British Army not to be false to their love of India and Independece of India in strong heart -stirring words. Miracle was accomplished. The shooting was stopped. Savarkar’s militarization policy in World War II began to shape. The speech was finished; waves of cheer rose from the Indian soilders who jumped into INA.” (Two Great Indians in Japan Page 48)

आझाद हिंदला मिळालेल्या या सैन्यात कॅप्टन मोहनसिंगांपेक्षा पदाने वरिष्ठ असलेले लेफटनंट गिलसुध्दा होते. त्यांनी नव्या सैन्यात मोहनसिंगांच्या सल्लागाराचे पद स्वीकारले.

‘सावरकरांचे दूस-या महायुध्दातील सैनिकीकरणाचे धोरण आकारास येऊ लागले .’ ही ओहसावाची साक्ष सर्वच सांगून जाते. सावरकर वगळता कोणत्याही नेत्याने सैनिकीकरणाचा इतका हिरीरीने प्रचार केला नव्हता. उलटा प्रचार मात्र अवश्य केला होता. ‘सैनिकीकरणाचा हा प्रचार म्हणजे हिंदू महासभेच्या व्यासपीठावरुन अवलंबिलेले अभिनव भारताचेच धोरण होते’ असे सावरकरांचेच प्रतिपादन आहे. (स सा वा खंड ८)

आझाद हिंदचा नेता पण सावरकरांच्या प्रभावात

कांग्रेसमध्ये असूनही व मुस्लिम प्रश्नावर सावरकरांसोबत तीव्र मतभेद असतानाही देशगौरव सुभाषचंद्रांच्या मनांत सावरकरांविषयी आदरभाव होता. १९३७ साली सावरकर निर्बंधमुक्त होताच सुभाषचंद्रांनी त्यांना कांग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. गंमत म्हणजे त्याच सुभाषचंद्रांना त्यानंतर अवघ्या दोन तीन वर्षात तीच काँग्रेस सोडावी लागली. सुभाषचंद्र कांग्रेसचे अध्यक्ष असतानाही त्यांची व सावरकरांची गुप्त भेट झाली होती.

२२ जून १९४० रोजी सावरकरांना भेटण्यासाठी सुभाषचंद्र अचानक सावरकर सदनात पोहोचले. सावरकरांचे चरित्रकार सांगतात कि पूर्व नियोजनाशिवाय सावरकर कोणालाही भेटत नसत. प्रख्यात क्रांतिकारक भाई परमानंद नि रा स्व संघाचे गोळवलकर गुरुजी सारख्या महान नेत्यांना सावरकर सदनात नियोजना विना (अपांइंटमेंट शिवाय) गेल्याने सावरकरांची भेट मिळाली नव्हती. पण पूर्व सूचनेशिवाय, अचानक सावरकर सदनांत पोहोचलेल्या सुभाषचंद्रांचे स्वागत वीर सावरकरांनी अत्यंत दिलखुलासपणे केले जणू काही ते सुभाषचंद्रांचीच वाट पहात होते.

खरे सांगायचे तर सावरकर चुंबकीय व्यक्तीत्व लाभलेले क्रांतिकारक नेता होते. त्यांच्याशी केवळ हस्तांदोलन करताच लाला हरदयाळ, अय्यरांसारखे खंबीर युवक सशस्त्र क्रांतिकारक झाले होते. आणि यावेळी त्यांच्यासोबत रासबिहारींसारखा कसलेला क्रांतिकारक सहकारीही होता. महायुध्दाच्या समयी सावरकर व रासबिहारींचे वय अनुक्रमे ५८ नि ५५ होते, इंग्रज सरकारची दोघांच्या हालचालीवर कडक नजर होती. त्यामुळे रासबिहारी नि सावरकरांनी निर्माण केलेल्या नव्या सेनेला कोणीतरी भारतविख्यात नि दमदार युवा सेनानी हवा असे दोघांनाही वाटत होते. त्यातही विस्मयाची बाब म्हणजे दोघांचीही दृष्टी गांधीजींना टक्कर देणा-या सुभाषचंद्रांवरच होती. अन् त्याचवेळी सुभाष स्वतः होऊन सावरकर सदनांत पोहोचले होते. सहजपणे चालून आलेली ही संधी सावरकर सोडू इच्छित नव्हते, त्यामुळेच अपॉइंटमेंट विना आलेल्या सुभाषचंद्रांना ते चटकन भेटले.

सावरकरांनी सुभाषचंद्रांना भारताबाहेर जाऊन जर्मन, इटली, जपान आदि इंग्रज विरोधी राष्ट्रांचे सहाय्य घेऊन, शरणागत इंग्रजी सैन्यातून नवीन भारतीय सैन्य उभारुन भारतावर आक्रमण करण्याची सूचना दिली. सोबतच जपानमध्ये रासबिहारी उभारत असलेल्या भारतीय सेनेची माहिती देत, त्यांना आलेले रासबिहारींचे नवे पत्रही दाखवले. ‘आता सेनेचे नेतृत्व करण्याचे आपले वा रासबिहारींचे वय नसल्याचे’ सांगत आपणच त्याचे नेतृत्व करावे असा सल्ला दिला.

वीर सावरकरांना भेटल्यानंतर नि जवळपास अशाच आशयाचे रासबिहारींचे पत्र मिळाल्यानंतरही सुभाषचंद्रांची मूळ धारणा बदलायला उशीर लागला, मात्र कारागारात असताना हेम घोष यांनीही तशीच सूचना केल्यावर सुभाषचंद्र बदलले. येथे हे सांगणे चूकीचे ठरणार नाही कि, भारताचा स्वातंत्र्य लढा या पुस्तकात सावरकरांच्या उपरोक्त भेटीचा संदर्भ देत सुभाषचंद्र संक्षेपात लिहितात, ‘श्री सावरकर आंतरराष्ट्रीय परिस्थितीबाबत अनभिज्ञ दिसून आले. आणि ते केवळ एवढाच विचार करतात की ब्रिटिश सेनेत शिरुन युवकांनी कशाप्रकारे सैन्य प्रशिक्षण मिळवावे.’ (पृ २२५)

व्यवस्थित पाहिले तर दिसून येईल सदर पुस्तकाला लेखक सुभाषचंद्र बोस यांची असलेली प्रस्तावना सन १९३४ ची आहे, तर वर्णित घटना त्यानंतर सहा वर्षांनंतरची म्हणजे १९४० ची आहे. याचाच अर्थ वरील मजकूर लेखकाच्या मृत्युपश्चात, लेखकाच्या पुनरावलोकनाशिवाय प्रस्तुत पुस्तकात जोडण्यात आला असावा. लेखकाचे वरील मत सावरकरांना भेटल्यावर तत्काळ नोंदवलेले कच्चे टिपणही असू शकते. क्षणभर असे गृहीत धरले की हेच सुभाषचंद्राचे ठाम मत होते. तरी त्यावरुन हेच सिध्द होते की, सुभाषचंद्रांच्या मतानुसार सावरकरजी सैनिकीकरणावर जोर देत होते. जे त्यांना मान्य नव्हते. मात्र सावरकरांच्या सैनिकीकरणाचे महत्व त्यावेळी न ओळखणा-या सुभाषचंद्रांना रासबिहारींना प्रत्यक्ष भेटल्यावर, आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारल्यावर, सावरकरांच्या दूरदृष्टीचा अनुभव आला. त्यामुळेच आकाशवाणीवर दि २५ जून १९४४ रोजी बोलताना ते म्हणाले, ‘’ When due to misguided political whims and lack of vision almost all the leaders of Congress party have been decrying all the soldiers in Indian National Army as mercenaries, it is heartening to know that Veer Savarkar is fearlessly exhorting youths of India to enlist in the Armed Forces. These enlisted youths themselves provide us with trained men and soldiers for our Indian National Army.’’ (Indian Independent Leagues Publication)

सावरकरांच्या सैनिकीकरणाचे फळ प्रत्यक्ष अनुभवणा-या नेताजींची ही स्पष्टोक्ती होती.

देशगौरव सुभाषचंद्र लोकप्रिय नेते होते, म गांधीविरुध्द जात त्यांनी दोनवेळा कांग्रेसचे अध्यक्षपद मिळविले होते. पण सावरकर नि रासबिहारी या दोन धुरंधर क्रांतिकारकांनी त्यांना देशगौरवचे नेताजी बनविले, निःशस्त्र सत्याग्रहीचे सशस्त्र क्रांतिकारक बनविले, त्यांच्या लौकीक लोकप्रियतेला अलौकीक चिरंजीवीता प्रदान केली, येणा-या पिढ्यांसाठी सुभाष मंत्र म्हणून उरले !

काही शंकासूरांना वाटते सुभाषचंद्रांनी आझाद हिंद सेनेतील रेजिमेंटसना गांधी, नेहरु, आझाद अशी नावे दिली. सावरकरांचे नांव का नाही दिले? याचे कारण असे की आझाद हिंद सेना ही सशस्त्र क्रांतिकारी सेना होती. सशस्त्र क्रांतिकार्यात प्रसिध्दी अन् श्रेयाचा हव्यास धोकादायक ठरतो, ठेवलेला पुरावा शिक्षेस कारण ठरतो. त्यामुळे हे हेतुतः टाळले गेले असावे. येथे हे ही नमूद करायला हवे कि सावरकरांनी सुध्दा आझाद हिंद सेना बंगाल सीमेला धडकताच बंगालच्या प्रांतिक हिंदु महासभेने, हिंदू महासभेपासून फुटून आझाद हिंदला मिळावे अशा सूचना ८ जुलै १९४४ रोजी सावरकरांनी डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी प्रभृती नेत्यांना दिल्या होत्या. त्यामुळे आपल्या सैनिकीकरणच्या कामात अडथळा येणार नाही असा त्यांचा होरा होता. (अखंड हिंदूस्थान लढा पर्व – बाळाराव सावरकर पृ ३३६-३३७) थोडकयात हा शत्रूला गाफील ठेऊन कार्य साधण्याचा उपाय होता.

जर १८५७ चे स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ नसता तर?

रासबिहारी, सुभाषचंद्र यांच्या महत्प्रयासांना नि सैनिकांच्या निःस्वार्थ देशभक्तीला हेटाळण्याचे कुकर्म तत्कालीन कांग्रेसने वारंवार केले. नेताजी जोवर जिवंत होते तोवर त्यांचा तेजोभंग करण्याचा यथाशक्य प्रयास केला. पंचशील नि अहिंसेचे पुजारी नेहरु सुभाषचंद्राच्या आझाद हिंद सेनेशी लढायला सशस्त्र जाणार होते. मात्र सरतेशेवटी कांग्रेसला सुभाषचंद्र नि आझाद हिंद सेनेचे गुणगान गावे लागले, न्यायालयात सेनेच्या बाजूने उभे राहावे लागले.

इंग्रजांशी नि:शस्त्र नि आझाद हिंद सेनेशी सशस्त्र लढू इच्छिणाऱ्या नेहरू आणि काँग्रेसला आझाद हिंदचे वकीलपत्र घ्यावे लागावे. ज्या सुभाषचंद्र बोसाना डावलले त्यांना मरणोत्तर गौरवावे लागावे, याचे एकमात्र कारण सावरकरांचा १८५७ स्वातंत्र्यसमर हा ग्रंथच होता. याविषयी गोष्टीचे संपादक सुब्बाराव १९४६ साली लिहितात, ‘’१८५७ ते १९४३ च्या मध्यंतरी जर सावरकर अवतीर्ण झाले नसते, तर ब्रिटिश नि कांग्रेस यांच्या महाशूर युतीने मिळून आझाद हिंद सेनेचा अलिकडचा युध्दप्रयत्न हा तिरस्करणीय बंडाचा क्षुद्र उद्योग आहे असे ठरविले असते. आणि दोघांनी मिळून सशस्त्र हिंसेने व निःशस्त्र अहिंसेने हा युध्दप्रयत्न समूळ चिरडून टाकला असता ! परंतु ‘बंड’ या संज्ञेच्या अर्थाबद्दलच भारतीयांच्या मनांत क्रांती घडवून आणण्याचे महत्कार्य सावरकरांच्या ग्रंथाने करुन दाखविले आहे. आणि मला वाटते, आता लॉर्ड वेव्हेल देखील बोसांच्या युध्दप्रयत्नांना ‘बंड’ म्हणू शकणार नाहीत ! या मूल्यपरिवर्तनाचे प्रमुख श्रेय सावरकरांचेच आहे, एकमेव त्यांचेच आहे.’’

यावर वेगळ्या भाष्याची गरज नसावी.

सुभाषचंद्रांच्या स्वर्गारोहणानंतर ही सैनिकात उसळलेली देशभक्तीची भावना शमली नाही, तर अधिकच त्वेषाने पेटली. नौदळ, वायुदळ बंड करुन उठले इंडीयन इंडीपेंडंट ॲक्टच्या वेळी ब्रिटिश पंतप्रधान ॲटलीला सांगावे लागले कि, ‘’आम्ही भारताला स्वातंत्र्य देतोय कारण की,आता १. भारतीय सेना इंग्रजांशी इमानदार राहिलेली नाही आणि २. भले मोठे इंग्रजी सैन्य धाडून तिला अंकीत ठेवणे आम्हाला परवडणारे नाही.’’

ॲटलीचे वरील उद्गार, त्यातील दोन्ही कारणे, सैनिकी सामर्थ्याचीच चर्चा करतात; निःशस्त्र सत्याग्रहाची नव्हे!

अंततः म्हणावे लागते कि १८९९ पासून १९४७ पर्यंत सावरकर स्वातंत्र्यासाठी जे प्रयत्न करीत होते. त्याचेच एक प्रतिफळ आझाद हिंद सेना होती आणि सावरकरच तिचे ध्येयजनक होते.

(डॉ नीरज देव हे दशग्रंथी सावरकर ने सन्मानित व मनो चिकित्सक आहेत.)

(नोंद : या ब्लॉगमधील सर्व मतं ही लेखकाची वैयक्तिक मतं असून ‘लोकसत्ता डॉट कॉम’ या मतांशी सहमत असेलच असं नाही.)

मराठीतील सर्व ब्लॉग्स ( Blogs ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Veer savarkar was inspiration behind subhash chandra bose azad hind fauj blog by dr niranjan dev

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी