राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी टेलिव्हिजनवर मोठ्याप्रमाणावर विकासकामांच्या जाहिराती दाखवल्या जात आहेत. मात्र, सोशल मीडियावरून करण्यात येणाऱ्या टीकेमुळे भाजपला यापैकी एक जाहिरात मागे घ्यावी लागली आहे. भाजपकडून विकासकामांच्या प्रसिद्धीसाठी ‘मेड फॉर इच अदर’ या कॅचलाईनखाली ही जाहिरात दाखविली जात होती. काही महाविद्यालयीन तरुणांमधील संवाद या जाहिरातीमध्ये दाखविण्यात आला आहे. भाजप पक्ष मुंबईसाठी का गरजेचा आहे, हे सांगताना हे तरुण भाजपच्या विकासकामांचा पाढा वाचताच. मात्र, या जाहिरातीचा एकुणच दर्जा सुमार आहे. त्यामुळे प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावरून या जाहिरातीवर टीकेचा प्रचंड भडीमार होऊ लागला होता. त्यामुळे अखेर भाजपने ही जाहिरात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सोशल मीडिया विभागाला चांगलेच खडसावल्याचेही वृत्त आहे. तर दुसरीकडे भाजप नेते माधव भंडारी यांनी या सगळ्याचे खापर जाहिरात बनविणाऱ्या कंपनीवर फोडले आहे. जाहिरात कंपनीतील लोक वेगळ्या वातावरणात काम करतात. त्यामुळे त्यांना राजकीय आणि सामाजिक भावना समजत नाहीत. काहीवेळा जाहिरातींमधून चुकीचा संदेश जातो. त्यामुळे अशा जाहिराती लोकांना आवडल्या नाहीत तर त्या मागे घ्याव्या लागतात, असे भंडारी यांनी सांगितले.
मुंबई महापालिका निवडणुकीत विविध आश्वासने देऊन मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून तब्बल ५०० कोटींची जाहिरातबाजी करण्यात आली आहे. या जाहिरातींवर प्रकाशकाचे नाव देणे कायद्याने बंधनकारक असतानाही भाजपने कोणत्याही जाहिरातीत प्रकाशकाच्या नावाचा उल्लेख न करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. महापालिका निवडणुकीत पैशाच्या जिवावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. एका पक्षाला मुंबईतील २२७ उमेदवारांसाठी २२ कोटी ७० लाखांच्या मर्यादेत खर्च करण्याची परवानगी असतानाही भाजपकडून मात्र तब्बल ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.