भाजपपाठोपाठ काँग्रेसचाही दावा नाही

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महापालिकेतील सर्वात मलाईदार समिती म्हणून ओळखली  जाणारी स्थायी समिती आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाची असलेल्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही उमेदवार न दिल्याने या दोन्ही समित्या आता शिवसेनेच्या खिशात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवारी दिलेले रमेश कोरगावकर आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार शुभदा गुडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याची अधिकृत घोषणा १४ मार्च रोजी करण्यात येणार आहे.

स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या १४ मार्च रोजी होत आहे. या समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. त्यानिमित्ताने शिवसेनेने स्थायी समिती सदस्य आणि शिक्षण समितीच्या सदस्यांना शुक्रवारी ११ वाजता पालिका मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अनेक सदस्य पालिका मुख्यालयात पोहोचले होते. पण स्थायी समिती आणि शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी कोण उमेदवारी अर्ज भरणार याची कल्पना मात्र कुणालाच नव्हती. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली होती.

स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची उमेदवारी नगरसेवक रमेश कोरगावकर यांना, तर शिक्षण समिती अध्यक्षपदाची उमेदवारी नगरसेविका शुभदा गुडेकर यांना देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर या दोघांनीही पालिका चिटणीस विभागात जाऊन उमेदवारी अर्ज सादर केला. अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत काँग्रेसकडून या दोन्ही समित्यांच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सादरच करण्यात आले नाही. त्यामुळे कोरगावकर आणि गुडेकर यांचा विजय निश्चित झाला आहे.

सातमकर नाराज

स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी मंगेश सातमकर आणि आशीष चेंबूरकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. सातमकर यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार असे संकेत शुक्रवारी सकाळपासून मिळत होते. परंतु अचानक दुपारी कोरगावकर यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे पालिका मुख्यालयात उपस्थित असलेले सातमकर प्रचंड नाराज झाले आणि तेथून ते निघून गेले. पालिकेमध्ये तब्बल १५ वर्षे आपण नगरसेवक म्हणून काम केले आहे. त्यामुळे स्थायी समितीचे अध्यक्षपद आपल्याला मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु संधी हुकल्यामुळे आपण नाराज झालो आहोत, असे मंगेश सातमकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आणि ते पालिका मुख्यालयातून निघून गेले.

मराठीतील सर्व मुंबई महापालिका निवडणूक २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena won bmc standing committee president election